नांदेड,(प्रतिनिधी) :- प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ अनुसूचित जाती (SC) व अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांना मिळावा यासाठी शासनाच्या निर्देशानुसार १ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत विशेष जनजागृती व अर्ज नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे.
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील सर्व पात्र शेतकऱ्यांना या विशेष अभियानाचा लाभ घेऊन महाडीबीटी पोर्टलवर तात्काळ अर्ज नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी संबंधित मंडळ कृषी अधिकारी किंवा सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
अनुदानाबाबत महत्त्वाची माहिती : शासनाच्या प्रचलित तरतुदीनुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना २५ टक्के, इतर शेतकऱ्यांना ३० टक्के अनुदान मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेंतर्गत देण्यात येईल. तसेच उर्वरित १० किंवा १५ टक्के अनुदान डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना / बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत अदा करण्यात येणार असून पात्र लाभार्थ्यांना एकूण ९० टक्के पर्यंत अनुदान उपलब्ध होईल.
महाडीबीटी पोर्टलवरील अर्जांची संख्या कमी असलेल्या गावांमध्ये विशेष जनजागृती करण्यात येणार असून तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांकडून जास्तीत जास्त अर्ज भरून घेण्यावर भर दिला जाणार आहे.

