नांदेड (प्रतिनिधी) :- सन 2026 मधील दिवाळी उत्सव दि. 5 ते 11 नोव्हेंबर 2026 या कालावधीत साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर नांदेड महानगरपालिका हद्दीसाठी तात्पुरते फटाका विक्री परवाने जिल्हादंडाधिकारी कार्यालयामार्फत, तर जिल्ह्यातील संबंधित उपविभागांच्या कार्यक्षेत्रासाठी उपविभागीय दंडाधिकारी यांच्यामार्फत निर्गमित करण्यात येणार आहेत. त्यासाठी तात्पुरत्या फटाका विक्री परवान्याचे अर्ज दि. 13 ऑक्टोबर 2026 पर्यंत संबंधित कार्यालयात स्वीकारले जाणार आहेत.
नांदेड महानगरपालिका हद्दीतील तात्पुरत्या फटाका परवान्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू समितीमार्फत, तर जिल्ह्यातील इतर भागांसाठी संबंधित उपविभागीय कार्यालयामार्फत अर्ज स्वीकारण्यात येतील. अर्जदारांनी विस्फोटक अधिनियम व स्फोटक नियम, 2008 मधील तरतुदींनुसार विहित नमुना AE-5 मध्ये अर्ज सादर करावा. अर्जासोबत फटाका विक्रीच्या दुकानाचा नकाशा, दोन पासपोर्ट आकाराचे छायाचित्रे, रुपये 600 शुल्क भरल्याच्या चलनाची प्रत, सामूहिक विक्री केंद्र असल्यास दुकान क्रमांक नमूद असलेले वाटपपत्र, संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना-हरकत प्रमाणपत्र, संबंधित पोलीस ठाण्याचे चारित्र्य व ना-हरकत प्रमाणपत्र, जिल्हा व्यवसायकर अधिकारी यांचे ना-हरकत प्रमाणपत्र, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे ना-हरकत प्रमाणपत्र, विद्युत निरीक्षकांचे ना-हरकत प्रमाणपत्र, जागेच्या मालकी हक्काचा पुरावा आणि संबंधित तहसीलदारांचे ना-हरकत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
फटाका विक्रीच्या दुकानाचा नकाशा स्थानिक प्राधिकरणाकडून साक्षांकित केलेला असावा. दुकानातील साठा व विक्रीची जागा, साठवणूक क्षमता, ये-जा करण्याचा मार्ग आणि परिसरातील सुविधा यांचा नकाशात स्पष्ट उल्लेख असणे आवश्यक आहे. नियम 84 नुसार दुकानांमध्ये किमान 3 मीटर अंतर तसेच संरक्षित क्षेत्रापासून किमान 50 मीटर अंतर राखणे आवश्यक आहे. दुकान क्रमांकाचाही नकाशात स्पष्ट उल्लेख असावा. नोंदणीकृत अथवा मान्यताप्राप्त असोसिएशनमार्फत सामूहिक स्वरूपात अर्ज केल्यास, परवान्यात नमूद करण्यात येणाऱ्या अटी व शर्तीनुसार संबंधित दुकानांची उभारणी करणे बंधनकारक राहील. विस्फोटक नियम किंवा परवान्यातील अटींचे उल्लंघन होऊन कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित असोसिएशनची राहील. याबाबत असोसिएशनचे शपथपत्र सादर करणे आवश्यक आहे. तसेच दुकानाच्या ठिकाणी अग्निशमन दल, सुरक्षा रक्षक आदींची आवश्यक व्यवस्था करावी लागणार आहे. अर्जदाराने विहित नमुन्यातील सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर संबंधित कार्यालयाकडून चलन देण्यात येईल. चलनाद्वारे शुल्क शासन खात्यात जमा केल्यानंतर त्याची प्रत अर्जासोबत जोडावी. परिपूर्ण अर्जांच्या आधारे नांदेड महानगरपालिका हद्दीतील तात्पुरते फटाका विक्री परवाने दि. 26 व 27 ऑक्टोबर 2026 रोजी जिल्हादंडाधिकारी, नांदेड यांच्यामार्फत, तर संबंधित उपविभागाच्या हद्दीतील परवाने संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांच्यामार्फत निर्गमित करण्यात येतील.
दिवाळी उत्सवाच्या कालावधीत स्फोटक नियम (The Explosives Rules), 2008 मधील नियम 84(6) नुसार एकाच ठिकाणी 50 पेक्षा अधिक फटाका विक्रीच्या दुकानांना परवानगी दिली जाणार नाही. परवान्यात विहित केलेल्या साठा व विक्रीच्या प्रमाणापेक्षा अधिक व्यवहार करता येणार नाही. तसेच नियमांनुसार आणि SET-X ते SET-XV मधील निर्देशांनुसार साठा नोंदवही ठेवून ती तपासणीसाठी उपलब्ध करून देणे बंधनकारक राहील.
अनधिकृतपणे विस्फोटक पदार्थांचा साठा किंवा विक्री करणे हा गंभीर स्वरूपाचा व दंडनीय अपराध आहे. शासनस्तरावरून तसेच विस्फोटक नियंत्रक व संबंधित विभागांकडून वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या अटी व शर्तींचे पालन करणे बंधनकारक राहील. त्यामुळे इच्छुक अर्जदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रांसह दि. 13 ऑक्टोबर 2026 ही अंतिम मुदत लक्षात घेऊन संबंधित कार्यालयात अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

