अनुदानित युरिया खताच्या बेकायदेशीर वाहतुकीवर कृषी विभागाची धडक कारवाई

धर्माबादमध्ये एकाच दिवशी दोन कारवाया ; दोन टेम्पोसह रु. 15.70 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोन गुन्हे दाखल

नांदेड, (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांसाठी शासनाकडून अनुदानावर उपलब्ध करून दिले जाणारे युरिया खत बेकायदेशीरपणे तेलंगणात पाठविण्याच्या प्रयत्नावर कृषी विभागाच्या जिल्हा भरारी पथकाने कारवाई केली. धर्माबाद येथे एकाच दिवशी करण्यात आलेल्या दोन स्वतंत्र कारवायांमध्ये दोन टेम्पोसह एकूण 15 लाख 70 हजार 607 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, धर्माबाद पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जिल्हा भरारी पथक प्रमुख तथा मोहिम अधिकारी सचिन कपाळे आणि पथक सचिव अमोल पेकम यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी राखीव असलेला अनुदानित युरियाचा साठा विनापरवाना तेलंगणात पाठविला जात असल्याचे उघड झाले. त्यानुसार कृषी विभागाने सापळा रचून संशयित टेम्पो अडवले.

कृषी अधिकारी (गुण नियंत्रण), धर्माबाद यांनी वाहनांची तपासणी केली असता कोणतीही वैध परवानगी किंवा आवश्यक कागदपत्रांशिवाय युरियाची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. पहिल्या कारवाईत 9 लाख 40 हजार 385, तर दुसऱ्या कारवाईत 6 लाख 30 हजार 292 रुपये किमतीचा युरिया साठा व टेम्पो जप्त करण्यात आला.

कृषी विभागाचे गुण नियंत्रण निरीक्षक विशाल चंदापुरे यांच्या तक्रारीवरून संबंधित आरोपींविरुद्ध खत नियंत्रण आदेश, 1985, अत्यावश्यक वस्तू अधिनियम, 1955 तसेच भारतीय न्याय संहिता, 2023 मधील संबंधित कलमान्वये धर्माबाद पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शेतकऱ्यांच्या हक्काचे अनुदानित खत काळ्या बाजारात व परराज्यात वळविण्याचे प्रकार रोखण्यासाठी कृषी विभागाने कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली असून, या प्रकरणातील इतर संबंधितांचा शोध पोलीस घेत आहेत.

ही कारवाई जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, विभागीय कृषी सहसंचालक महेश तीर्थकर, मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी प्रवीण देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत आणि कृषी विकास अधिकारी डॉ. नीलकुमार एतवडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *