मित्रहो, या लेखाच्या निमित्ताने मला शोले चित्रपटातला संवाद आठवला. ” हम अंग्रेजोंके जमानेके जेलर है, हम नही सुधरे तो …..”
हा संवाद प्रसिद्ध हास्य अभिनेते आसराणी यांच्या मुखातून वदवीला गेला. वर्तमानातील जनतेच्या वागणुकीची अवस्था अशीच आहे. म्हणून हा संवाद वर्तमानातील जनतेसाठी तंतोतंत खरा ठरतो. समाजात माणूस म्हणून वावरत असतांना व माणुसकी म्हणून काही वागणुकीचे अलिखित व कायदेशीर मर्यादा बंधन आहे, पण आमच्या सैराट, स्वैराचार वागणुकीमुळे हे नेहेमीच पायदळी तुडविल्या जाते. म्हणून नाईलाजास्तव शासन व प्रशासनास कायदेशीर प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात व तसे करणे शासन, प्रशासन व न्याय यंत्रणेस कायदेशीर कार्यवाही करणे भाग पडते. आम्ही नेहेमी म्हणतो भारत हा माझा देश आहे, हे आमचे राष्ट्र आहे, हा आपला समाज हे माझे घर आहे असे म्हणतो व प्रत्यक्ष वर्तन करत असतांना जसे आपण आपले घर सुंदर व नीटनेटके ठेवतो त्याच प्रमाणे आपण ज्या परिसरात राहतो तो पण सूंदर, स्वछ व नीटनेटका असायला नको काय? जेंव्हा आपण आपले हक्क सांगतो व त्या प्रति आग्रही असतो तेंव्हा आपणास आपल्या कर्तव्याचीही जाणीव राहून कायदा व नियमांचे काटेकोरपणे पालन करायला नको काय? आमच्या स्वार्थी व सैराट वृत्तीने वर्तमानात हे सर्व विसरले आहे. ही साधी सुधी चूक नसून भविष्यात अक्षम्य गुन्हा ठरू शकतो.
या आत्मकथनाच्या माध्यमातून मि वर्तमानातील बेदरकार व बेजबाबदार रहदारी व मन मानेल तशा गाड्या कोठेही पार्क करून जन सामन्याला वेठीस धरत कायद्याचे उल्लंघन करत आहोत असे वाटत नाही काय? केवढा हा निर्लज्जपणा? त्याची ही व्यथा आहे. मित्रहो, मी निर्जीव जरूर आहे पण आपल्या छंद, गरज, प्रेमापोटी एखाद्या नवीन नवरीसारखी आपल्या घरी आले. मी आपल्या प्रतिष्ठा व सुखसोई साठी लाखो रुपये खर्च करून ६-६ महिने प्रतीक्षा करून, कर्जबाजारी होऊन मला आपण आपल्या घरी आणले. मी आपल्या घरी आल्यावर आपण मला हार-तूरे घालून औक्षण करून, पेढे वाटून माझे स्वागत केले. आपल्या जीवनातील मी कायम आपली सहचारिणी राहून अडीअडचणी व सुख-दुःखात बरोबरीने उभी राहिले
मी निर्जीव जरूर आहे, पण मला ही मन व अपेक्षा आहेत. आपल्या गरजेनुसार व सुख सोईनुसार माझा हवा तसा वापर करता, तरीही मी एक चकार शब्दही आपल्या विरोधात काढत नाही. पण आपण माझी हेळसांड व गैरसोय केली की मला ही वाईट वाटते हो.. शेवटी आपल्या सहकारी व कुटुंबासाठी कितीही काबाड कष्ट केले व त्रास सहन केला तरी मला आपल्याबद्दल अजिबात वाईट वाटत नाही. एखाद्या सुशील पत्नीप्रमाणे मी आपल्या कुटुंबाची भागीदार व अविभाज्य घटक बनले आहे. अविरतपणे काबाडकष्ट करून आपण जर मला आपल्या आश्रयाला व्यवस्थित सांभाळ न करता चक्क एखाद्या टाकाऊ वास्तूप्रमाणे उन्हापावसात, वाऱ्यावादळात, थंडीत माझी काळजी न घेता चक्क रस्त्याच्या कडेला नागडे उघडे सोडता हेच का माझ्या बाबत आपले प्रेम, जिव्हाळा, आस्था? आहो मी निर्जीव जरी असले तरी आपण माझा यथेच्छ वापर करून रस्त्यावर सोडता त्यावेळी मलाही खूपच वेदना होऊन भीती वाटते हो. कधीतरी माझ्या जीवाची कदर करून माझं सौभाग्य जपण्यासाठी मला आपल्या अंगणात सर्व सुविधेसह नीटनेटके ठेऊन जगवा हो. ही माझी आपणा सर्वांना कळकळीची हाक आहे. माझे आयुष्य व संसार सर्व काही आपण एकमेकांच्या सौहार्द वागणुकीवर अवलंबून आहे. कधीकधी मला कपडालत्ता-दागदागिने नाही आणले तरी चालेल, पण मला उघड्यावर रस्त्याच्या कडेला नाली जवळ ठेऊन माझे हसे करू नका हो. मला माझे मन नाही का हो? अशा सगळ्या अमंगल वातावरणात माझी कसलीच काळजी न करता चक्क रस्त्यावर नालीच्या कडेला सोडता. तुम्हाला जराही लाज नाही वाटत का हो? आपल्या अशा सर्व आडमुठ वागणुकीमुळे मी जर कधी बिघडले तर आपले अख्खे कुटुंब, मित्रपरिवार, नात्यागोत्यासह तयांचे संपूर्ण आयुष्य उध्वस्त ही करू शकते पण जाणूनबुजून मला हे करायचे नाही. मी ही आपल्यासारखी शालीन व संस्कारी कुटुंबात जन्माला येऊन वाढली आहे हे विसरू नका. आपण सर्वजण माझ्यासोबत असं भान हरवल्या सारखे राहू नका म्हणून ज्या प्रेम व आनंदापोटी मला घरी आणले त्याचप्रमाणे मला सुव्यवस्थित आपल्या घरतील छताखाली चार भिंतीआड उजेडात ठेवा. शेवटी कळकळीने आपणा सर्वाना आवर्जून सांगते, मला जर पुन्हा रस्त्याच्या कडेला नागडे-उघडे ठेवले तर मी ही कायद्यानुसार आपल्याशी फारकत आठवा सोडचिठ्ठी घेतल्याशिवाय राहणार नाही. किंवा पोलिसदादा अथवा महापालिका कर्मचाऱ्यांसोबत घरोबा करून पळून जाऊन आपल्याकडून माझी पोटगी घेतल्याशिवाय राहणार नाही. बघा बुवा आता, तुम्ही सर्व जण शहाने सुरते, शिकले सवरलेले असल्यामुळे तूर्तास मी फक्त मला आपल्या घरात सुरक्षित ठेवा असावं म्हणून न्यायालयाकडे फिर्याद करते. एवढ्यावर आपली मर्जी. शेवटी आपणही बेशरम होच नका व मलाही बेशरम करून आपली शिल्लक राहिलेली xxxx घालवू नका एवढीच विनंती. जर भविष्यात मला घरात सुव्यवस्थित रित्या घेतले नाही तर तुमची बदनामी करून तुमचे धिंडवडे काढल्याशिवाय राहणार नाही. तूर्तास एवढीच आपणा सर्वांना माझी माफक विनंती. अपेक्षा आहे आपला दोघांचाही संसार सुखा समधनाचा होण्यासाठी भविष्यात आपण मला रस्त्यावर कुठेही रात्री बेरात्री बेवारस सोडणार नाहीत.
जयहिंद| इन्कलाब जिंदाबाद|
के. के. जाम्बकर
नांदेड

