रेशीम शेतीचा यशस्वी प्रयोग : दीड एकरातून ५ ते ६ लाखांचे उत्पन्न; मांजरमचे भुजंग बापुराव शिंदे यांनी केली प्रेरणादायी रेशीमशेती

यशकथा…..

बदलते हवामान, वाढता उत्पादन खर्च आणि पारंपरिक शेतीतील अनिश्चित उत्पन्न या आव्हानांवर मात करत नायगाव तालुक्यातील मांजरम येथील प्रगतिशील शेतकरी भुजंग बापुराव शिंदे यांनी रेशीम शेतीचा यशस्वी प्रयोग करून आर्थिक समृद्धीचा नवा मार्ग शोधला आहे. अवघ्या दीड एकर क्षेत्रात रेशीम शेती करून ते आज दरवर्षी सुमारे ५ ते ६ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवत असून परिसरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहेत.

भुजंग शिंदे यांच्याकडे एकूण १५ एकर बागायती शेती आहे. अनेक वर्षे ते पारंपरिक पिकांची लागवड करत होते. मात्र, हवामानातील बदल, पावसाचा लहरीपणा, वाढता उत्पादन खर्च आणि कमी नफा यामुळे शेतीची आर्थिक शाश्वतता कमी होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे नियमित आणि अधिक उत्पन्न देणाऱ्या शेती व्यवसायाचा त्यांनी शोध सुरू केला.

या काळात त्यांनी जिल्हा रेशीम अधिकारी कार्यालय, नांदेड येथे संपर्क साधून रेशीम शेतीबाबत सविस्तर माहिती घेतली. कार्यालयामार्फत तुती लागवड, रेशीम किड्यांचे संगोपन, शास्त्रशुद्ध व्यवस्थापन, रोग नियंत्रण आणि उत्पादन तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन मिळाले. या तांत्रिक मार्गदर्शनामुळे प्रेरित होऊन त्यांनी सन २०१८-१९ मध्ये प्रायोगिक तत्त्वावर दीड एकर क्षेत्रात तुतीची लागवड करून रेशीम शेतीला सुरुवात केली.

सुरुवातीपासूनच त्यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने रेशीम किड्यांचे संगोपन केले. तुतीच्या बागेचे योग्य व्यवस्थापन, वेळेवर किड्यांचे पालन आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार नियोजन केल्यामुळे त्यांना सातत्याने चांगले उत्पादन मिळू लागले. सध्या ते दर २० ते ३० दिवसांनी एक बॅच तयार करतात. वर्षभरात ७ ते ८ बॅचचे उत्पादन घेऊन त्यातून वार्षिक ५ ते ६ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवत आहेत.

रेशीम शेतीमुळे त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. शेतीमधून नियमित रोख उत्पन्न मिळू लागल्याने शेतीवरील गुंतवणूक वाढविणे, आधुनिक साधनांचा वापर करणे आणि भविष्यातील नियोजन करणे अधिक सुलभ झाले आहे.

भुजंग शिंदे या युवा शेतकऱ्यांने आई, वडील व पत्नीच्या मदतीने शेतीची कामे पूर्ण करतात. त्यांच्या या यशामुळे परिसरातील अनेक शेतकरी रेशीम शेतीविषयी माहिती घेण्यासाठी त्यांच्या शेताला भेट देत आहेत. ते शेतकऱ्यांना रेशीम शेतीतील संधी, वैज्ञानिक पद्धती आणि शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याबाबत मार्गदर्शनही करतात.

शिंदे सांगतात, “रेशीम शेती ही नियमित उत्पन्न देणारी आणि कमी क्षेत्रातही फायदेशीर ठरणारी शेती आहे. जिल्हा रेशीम अधिकारी कार्यालयाच्या मार्गदर्शनामुळे मला योग्य दिशा मिळाली. मेहनत, नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास कोणताही शेतकरी या व्यवसायात यशस्वी होऊ शकतो.”

रेशीम शेतीसाठी शासनामार्फत विविध योजनांद्वारे तांत्रिक मार्गदर्शन, प्रशिक्षण तसेच पात्र लाभार्थ्यांना उपलब्ध असलेल्या अनुदानाचा लाभ घेता येतो. त्यामुळे उत्पन्न वाढविण्याची इच्छा असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या जिल्ह्यातील रेशीम अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून या व्यवसायाचा अवलंब करावा, असे त्यांनी सांगितले आहे.

भुजंग बापुराव शिंदे यांची यशोगाथा ही आधुनिक, वैज्ञानिक आणि उत्पन्नवाढीला चालना देणाऱ्या शेतीचा प्रेरणादायी आदर्श असून, बदलत्या कृषी परिस्थितीत रेशीम शेती हा शाश्वत पर्याय ठरू शकतो, याचे ती उत्तम उदाहरण आहे.

अलका पाटील

उपसंपादक

जिल्हा माहिती कार्यालय नांदेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *