नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपाचे अमरनाथ राजुरकर विजयी

नांदेड, (प्रतिनिधी ) :- महाराष्ट्र विधान परिषदेच्या नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अमरनाथ राजुरकर यांना विजयी घोषित करण्यात आले. विजयी उमेदवार अमरनाथ राजूरकर यांना निवडणूक निर्णय अधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

निवडणुकीतील मतदानाची मतमोजणी आज येथे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे पार पडली. मतमोजणीनंतर अमरनाथ राजूरकर यांनी ३३९ मताधिक्य मिळवत विजयी झाले असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जाहीर केले. यावेळी निवडणूक निरिक्षक डॉ. माधवी खोडे-चवरे या उपस्थित होत्या.

नांदेड विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अमरनाथ राजुरकर व अपक्ष उमेदवार कृष्णा नागेश पाटील, प्रशांत इंगोले असे एकूण ३ उमेदवार होते. या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानात जिल्ह्यातील आठ मतदान केंद्रावर ४५२ पैकी ४५१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. या मतांची मतमोजणी आज नियोजनच्या भवनच्या कॅबिनेट हॉल येथे कडेकोट बंदोबस्तात तसेच शांततेत व सुरळीत पार पडली.

मतमोजणीपुर्वी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी मतमोजणीच्या प्रक्रियेबाबत मतमोजणी अधिकारी-कर्मचारी यांना निर्देश दिले. यावेळी उमेदवार तसेच मतमोजणी प्रतिनीधीही उपस्थित होते. तीन टेबलवर मतमोजणी अधिकारी, सहायक अधिकारी-कर्मचारी यांच्याकडून मतमोजणी करण्यात आली. या मतमोजणीत ४२८ मते वैध ठरली. त्यापैकी अमरनाथ राजूरकर यांना ३३९ मते मिळाली तर अपक्ष उमेदवार कृष्णा नागेश पाटील यांना ८४ तर प्रशांत विराज इंगोले यांना ५ मते मिळाली. मतमोजणीत २३ मते अवैध ठरविण्यात आली.

मतमोजणीनंतर निवडणूक निर्णय अधिकारी राहुल कर्डिले यांनी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अमरनाथ राजूरकर यांना विजयी घोषित केले. यावेळी निवडणूक निरिक्षक डॉ. माधवी खोडे-चवरे यांच्यासह मतमोजणी प्रक्रियेत सहभागी अधिकारी अप्पर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदीप गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, उपजिल्हाधिकारी सामान्य अजय शिंदे, उपजिल्हाधिकारी निवडणूक राजकुमार माने, उपजिल्हाधिकारी (रोहयो) हनुमंत कोळेकर, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, भोकरचे उपविभागीय अधिकारी प्रविण मेगशेट्टी, देगलूरचे उपविभागीय अधिकारी अनुप पाटील, तहसिलदार संजय वारकड आदींसह विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.

मतमोजणी प्रक्रिया तसेच स्थानिक प्राधिकारी निवडणुकीची सर्वच प्रक्रिया शांतता व सुव्यवस्थेत पार पाडण्यासाठी सहकार्य करणाऱ्या अधिकारी-कर्मचारी तसेच विविध घटकांचे उपजिल्हाधिकारी निवडणूक राजकुमार माने यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *