केंद्रीय प्रशिक्षण महाविद्यालय, मुदखेड येथे डीएएसओ-९८ प्रशिक्षणार्थ्यांचा दीक्षांत व शपथविधी सोहळा संपन्न

नांदेड, (प्रतिनिधी) :- केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) केंद्रीय प्रशिक्षण महाविद्यालय, मुदखेड येथे थेट नियुक्त अधीनस्थ अधिकारी (डीएएसओ-98) मूलभूत प्रशिक्षणक्रमाच्या ५७ प्रशिक्षणार्थ्यांचा दीक्षांत व शपथविधी सोहळा आज उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

समारंभाच्या अध्यक्षस्थानी पोलीस महानिरीक्षक तथा प्राचार्य, केंद्रीय प्रशिक्षण महाविद्यालय, मुदखेड आर. गोपाला कृष्ण राव (भा.पो.से.) हे होते. त्यांनी आकर्षक परेडची सलामी स्वीकारून प्रशिक्षणार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

देशातील विविध राज्यांतून केंद्रीय राखीव पोलीस दलात थेट नियुक्त झालेल्या ५७ अधीनस्थ अधिकारी प्रशिक्षणार्थ्यांनी ४८ आठवड्यांचे मूलभूत प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले. या कालावधीत त्यांना शारीरिक क्षमता विकास, विविध अस्त्र-शस्त्रांचे प्रशिक्षण, युद्धकौशल्य, अंतर्गत सुरक्षा, प्रशासकीय जबाबदाऱ्या तसेच कर्तव्य पालनासंबंधी विविध विषयांचे सखोल प्रशिक्षण देण्यात आले.

यावेळी कमांडंट वेद प्रकाश त्रिपाठी यांनी उपनिरीक्षक (जीडी) प्रशिक्षणार्थ्यांना दलाच्या सदस्यत्वाची शपथ दिली. देशाची एकता, अखंडता व सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी तसेच कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रसेवेसाठी तत्पर राहण्याची प्रतिज्ञा प्रशिक्षणार्थ्यांनी यावेळी केली.

यावेळी मार्गदर्शन करताना आर. गोपाला कृष्ण राव यांनी नवप्रशिक्षित अधिकाऱ्यांचे अभिनंदन करून सेवाकाळात येणाऱ्या आव्हानांचा धैर्याने सामना करीत शिस्त, समर्पण आणि कर्तव्यनिष्ठा जपत देशसेवा करण्याचे आवाहन केले. प्रशिक्षणादरम्यान विविध विषयांत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांचा त्यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला. परेडदरम्यान प्रशिक्षणार्थ्यांनी विविध प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून आपल्या कौशल्याचे प्रभावी सादरीकरण केले.

या दीक्षांत सोहळ्यास प्रशिक्षणार्थ्यांचे पालक व कुटुंबीय, आरटीसी सीआरपीएफ, लातूरचे पोलीस उपमहानिरीक्षक अमीरिल हसन अन्सारी, केंद्रीय प्रशिक्षण महाविद्यालयाचे मुख्य प्रशिक्षण अधिकारी वेद प्रकाश त्रिपाठी, नांदेड जिल्ह्यातील विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, मान्यवर नागरिक, विविध शाळांचे शिक्षक, विद्यार्थी तसेच केंद्रीय विद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *