जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी स्वतः गणनापत्र भरून केली मोहिमेची पाहणी
नांदेड (प्रतिनिधी) :- भारतातील लोकशाही अधिक सक्षम, पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्याच्या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नांदेड जिल्ह्यात विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण मोहीम सुरू झाली आहे. या मोहिमेअंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्या माध्यमातून मतदाराचे गणनापत्र भरुन घेण्याची प्रक्रीया ३० जून पासून आहे. या मोहिमेच्या अंमलबजावणीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी काल नांदेड येथील कौठा व विष्णुपूरी येथे भेट दिली. यावेळी त्यांनी स्वतः मतदारांचे गणनापत्र (एन्युमरेशन फॉर्म) भरुन ॲपवर ऑनलाईन सादर केले.
यावेळी त्यांनी सर्व नागरिकांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांना अचूक माहिती देऊन या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत सक्रिय सहकार्य करण्याचे आवाहन केले.
३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत नांदेड जिल्ह्यातील २७ लाख ७७ हजार ७३ एवढया मतदारांची घराघरांत जाऊन प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येणार आहे. यासाठी ३ हजार ८८ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ), ३१० बीएलओ पर्यवेक्षक, ९ मतदार नोंदणी अधिकारी आणि ९० सहायक मतदार नोंदणी अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.
🏡 बीएलओ आपल्या घरी आल्यावर काय करावे?
✅ अंशतः भरलेले गणनापत्र काळजीपूर्वक तपासा.
✅ आवश्यक दुरुस्त्या असल्यास त्या नोंदवा.
✅ दोन्ही प्रतींवर स्वाक्षरी करा.
✅ अद्ययावत छायाचित्रासह संबंधित बीएलओकडे गणनापत्र जमा करा.
✅ कोणतीही माहिती लपवू नका; अचूक माहिती द्या.
पूर्वतयारी केल्यास पडताळणी अधिक सोपी होईल
घरभेटीपूर्वी voters.eci.gov.in संकेतस्थळ किंवा ECINet App वर जाऊन स्वतःचा अथवा आई-वडिलांचा मतदार तपशील (नाव, मतदारसंघ, भाग क्रमांक, अनुक्रमांक) तपासून ठेवा. त्यामुळे बीएलओकडील पडताळणी जलद आणि सुलभ होईल.
ही कागदपत्रे तयार ठेवा
जर तुमचे किंवा तुमच्या आई-वडिलांचे नाव २००२ च्या विशेष सखोल पुनरीक्षणात नोंदलेले नसेल, तर जन्माचा दाखला, दहावीचे गुणपत्रक/शैक्षणिक प्रमाणपत्र, पासपोर्ट, रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र, शासकीय किंवा सार्वजनिक उपक्रमातील कर्मचारी ओळखपत्र, कुटुंब नोंदवही, शासनाकडील जमीन किंवा घर वाटपाचे प्रमाणपत्र, वनहक्क प्रमाणपत्र, राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा पुरावा, बँक/टपाल/भारतीय आयुर्विमा महामंडळ किंवा शासनाने १ जुलै १९८७ पूर्वी जारी केलेले ओळखपत्र अथवा प्रमाणपत्र, तसेच आधार कार्ड यापैकी आवश्यक कागदपत्रे जवळ ठेवा.
विशेष पुनरीक्षणाचे वेळापत्रक
🟢 ३० जून ते २९ जुलै २०२६ – घराघरांत जाऊन माहिती संकलन व पडताळणी
🟢 ५ ऑगस्ट २०२६ – प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
🟢 ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६ – दावे व हरकती स्वीकारणे
🟢 ५ ऑगस्ट ते ३ ऑक्टोबर २०२६ – दावे-हरकतींची सुनावणी व निकाली काढणे
🟢 ७ ऑक्टोबर २०२६ – अंतिम मतदार यादी प्रसिद्ध
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे आवाहन
“अचूक मतदार यादी ही सक्षम लोकशाहीचा पाया आहे. प्रत्येक पात्र मतदाराची योग्य नोंद होणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना आवश्यक ती अचूक माहिती व कागदपत्रे उपलब्ध करून द्या आणि विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम यशस्वी करण्यासाठी सक्रिय सहकार्य करा.”
आपल्या एका सहकार्यामुळे मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि त्रुटीमुक्त होईल. चला, सक्षम लोकशाहीसाठी आपण सर्वजण जबाबदारीने सहभागी होऊया!

