स्वयंसेवकांना दिले जाणार विशेष प्रशिक्षण
नांदेड (प्रतिनिधी) :- केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार नांदेड जिल्ह्यामध्ये ‘टीबी मुक्त भारत अभियान’ अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी ‘पायलट प्रोजेक्ट’ सुरू करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील 5 उच्च-जोखीम असणाऱ्या गावांची निवड करण्यात आली असून, प्रत्येक गावात ५ ‘माय भारत’ (MY Bharat) स्वयंसेवक (Volunteers) व ५ ‘एनसीसी’ (NCC) कॅडेट्स अशा १० सदस्यांच्या टीमची नेमणूक करून त्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे.
या महत्त्वपूर्ण प्रकल्पाच्या नियोजनासाठी १२ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष आढावा बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हा आरोग्य प्रशासनातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सलमा हिराणी, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. मीरदुडे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. चव्हाण, जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी रेणुका दराडे आदीची उपस्थिती होती.
पायलट प्रोजेक्टची प्रमुख वैशिष्ट्ये व अंमलबजावणी:
५ गावांची निवड व स्वयंसेवकांची नियुक्ती:
जिल्ह्यातील निवडक ५ गावांमध्ये प्रत्येकी ५ माय भारत स्वयंसेवक आणि ५ एनसीसी कॅडेट्स यांची ‘टीबी मुक्त भारत टीम’ तयार केली जाईल. प्रत्येक टीमचे नेतृत्व एका प्रथम वर्ग वर्ग-१ नोडल अधिकाऱ्याकडे असेल.
प्रशिक्षण व क्षमता बांधणी
निवडलेल्या स्वयंसेवकांना क्षयरोग (TB) नियंत्रण, लक्षणे ओळखणे, जनजागृती आणि रुग्णांना सहाय्य करण्याचे विशेष प्रशिक्षण दिले जाईल. यामध्ये २ दिवसांचे ‘नो टीबी सेशन्स’ (Know TB Sessions) आणि ५ दिवसांचा ‘प्रत्यक्ष अनुभव आधारित शिक्षण कार्यक्रम’ (Experiential Learning Program – ELP) यांचा समावेश असेल.
फील्डवरील मुख्य कामे:
हे स्वयंसेवक गावात घरोघरी जाऊन क्षयरोगाबद्दल जनजागृती करणे, ‘स्वच्छता’ आणि ‘नशा मुक्ती’चा संदेश देणे, आयुष्मान आरोग्य शिबिरांमध्ये सहभाग नोंदवणे, तसेच क्षयरोग रुग्णांना ‘निक्षय मित्र’ (Ni-kshay Mitra) योजनेअंतर्गत पोषण आहार किट वाटप करण्यात मदत करतील.
बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी निर्देश दिले की, “ हा पायलट प्रोजेक्ट अत्यंत गांभीर्याने आणि प्रभावीपणे राबवण्यात यावा. आरोग्य विभाग, शिक्षण संस्था, एनसीसी आणि युवा स्वयंसेवकांच्या समन्वयातून नांदेड जिल्हा क्षयरोगमुक्त करण्यासाठी सर्व यंत्रणांनी सक्रिय योगदान द्यावे.

