नांदेड, (प्रतिनिधी) :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना अंतर्गत सन २०२४-२५ व २०२५-२६ मधील प्रलंबित (Send Back) अर्जातील त्रुटीची पूर्तता करण्यासाठी मंगळवार ३० जून २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी या योजनेच्या लाभ घेण्यासाठी त्रुटीची पूर्तता करावी, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.
अनुसूचित जातीतील जे विद्यार्थी 50 टक्के पेक्षा अधिक गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत व ज्या विद्यार्थ्यांना समाज कल्याणच्या शासकीय वस्तीगृहात प्रवेश मिळालेला नाही अशा विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना राबवली जात आहे. योजना ही जिल्हा तसेच तालुका स्तरावर राबविण्यात येत असून जे महाविद्यालय महानगरपालिकेपासून पाच किलोमीटरच्या आतमध्ये व नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत तसेच तालुक्याच्या हद्दीत असलेले महाविद्यालयातील प्रवेशित पात्र विद्यार्थ्यांनी सन २०२४-२५ व २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात त्रुटी अभावी प्रलंबित असलेले अर्ज असल्यास विद्यार्थ्यांनी आपल्या अर्जाची सद्यस्थिती तपासण्यासाठी https//hmas.mahait.org या संकेतस्थळावर जाऊन आपला यूजर आयडी व पासवर्ड टाकून आपल्या अर्जाची सद्यस्थिती पहावी.
अर्ज Send Back मध्ये असेल तर विद्यार्थ्यांनी तात्काळ आपल्या त्रुटीची पूर्तता व्यवस्थितरित्या परिपूर्ण कागदपत्रासह करण्यासाठी मंगळवार ३० जून २०२६ पर्यंत संधी देण्यात आली आहे. योजनेअंतर्गत प्राप्त अर्जांची छाननी सुरू असून अनेक अर्जामध्ये आवश्यक कागदपत्रांची कमतरता किंवा तांत्रिक त्रुटी आढळून आले आहेत. स्वाधार योजनेच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्य मिळत असल्याने या मुदत वाढीचा लाभ घेऊन पात्र विद्यार्थ्यांनी आपल्या अर्जातील त्रुटी दूर कराव्यात.
मुदतवाढ ही शेवटची असेल व यानंतर आपला अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची दक्षता विद्यार्थ्यांनी घ्यायची आहे. आपल्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावर सदरील मॅसेज आल्यानंतर तत्काळ स्वाधारला अर्ज करायचा आहे. जर आपला अर्ज Approved असेल तर आपल्या बँक खात्याची माहिती त्या ठिकाणी योग्यरीत्या भरायचे आहे. आपले बँक खाते क्रमांक हे आधार संलग्न असणे आवश्यक आहे. प्रस्तुत कार्यालयाअंतर्गत समाज कल्याण कार्यालयाचे अधिकृत सोशल मीडियाचे पेज इंस्टाग्राम व फेसबुक पेज samajkalyannanded याला फॉलो करून आपल्या येणाऱ्या अडचणीबाबत वेळोवेळी त्याच्यावर देण्यात आलेली माहिती पहावी व आपल्या शंकेचे निरसन करावे. बाहेर इतर कुठल्याही अनाधिकृत ग्रुप किंवा व्यक्तीशी संपर्क न साधता थेट समाज कल्याण कार्यालयातील संबंधित कर्मचाऱ्यांना येऊन आपल्या समस्या बद्दल विचारणा करावी, असेही आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी विद्यार्थ्यांना केले आहे.

