रास्तभाव दुकानांसाठी अर्ज व आक्षेप दाखल करण्यास मुदतवाढ इच्छुकांनी 12 ऑगस्टपर्यंत अर्ज, तर 31 जुलैपर्यंत आक्षेप दाखल करावेत

नांदेड, (प्रतिनिधी) :- नांदेड जिल्ह्यातील अकार्यान्वित (पर्यायी व्यवस्थेतील) रास्तभाव दुकानांच्या वाटपाबाबत 1 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिर प्रगटनाच्या अनुषगाने अर्ज सादर करण्याची तसेच आक्षेप नोंदविण्याची मुदत वाढविण्यात आली आहे.

जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांकडून अभिलेखांची पडताळणी केल्यानंतर विविध कारणांमुळे अकार्यान्वित असलेल्या एकूण 122 रास्तभाव दुकानांसाठी 13 जुलै 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व तहसील कार्यालये तसेच ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका व महानगरपालिका येथे जाहिर प्रगटन प्रसिद्ध करण्यात आले आहे. या जाहिर प्रगटनामध्ये अर्ज सादर करण्यासाठी आवश्यक अटी व शर्ती नमूद करण्यात आल्या आहेत. तसेच 11 जुलै 2026 रोजी स्थानिक वृत्तपत्रांमधूनही यासंदर्भातील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.

शासन निर्णय क्र. राभादु-2117/प्र.क्र.157/ना.पु.31, दि. 2 फेब्रुवारी 2022 तसेच जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेनुसार अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत आता दि. 12 ऑगस्ट 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

याशिवाय, दि. 1 जुलै 2026 रोजीच्या जाहिर प्रगटनाबाबत आक्षेप नोंदविण्याची मुदतही 31 जुलै 2026 पर्यंत कार्यालयीन वेळेत वाढविण्यात आली आहे. या मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या आक्षेपांचा विचार केला जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

इच्छुक नागरिकांनी आपल्या कार्यक्षेत्रातील संबंधित तहसील कार्यालयाशी संपर्क साधून विहित मुदतीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. जाहिर प्रगटनातील इतर सर्व अटी व शर्ती पूर्ववत लागू राहतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *