नांदेड, (प्रतिनिधी) :- राज्यामध्ये क्रीडा क्षेत्राचा विकास व्हावा तसेच नागरिकांचे आरोग्यमान सुधारावे, या उद्देशाने शासनाच्या क्रीडा व युवा धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या धोरणाअंतर्गत विद्यार्थी व तरुणांसाठी व्यायामशाळा आणि क्रीडांगणे विकसित करण्यासाठी व्यायामशाळा विकास अनुदान योजना आणि क्रीडांगण विकास अनुदान योजना राबविण्यात येत असून, सन 2026-27 साठी पात्र संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.
व्यायामशाळा विकास अनुदान योजना
या योजनेंतर्गत किमान 1,000 चौरस फूट जागा आणि त्यापैकी 500 चौरस फूट चटई क्षेत्राचे स्वतंत्र व्यायामगृह असणे आवश्यक आहे. व्यायामगृहाच्या बांधकामासाठी कमाल 14 लाख रुपये अनुदान उपलब्ध आहे. तसेच अत्याधुनिक व्यायाम साहित्य खरेदी व ओपन जिम (Open Gym) उभारणीसाठी कमाल 7 लाख रुपये अनुदान दिले जाते.
या योजनेसाठी नांदेड जिल्ह्यातील शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय रुग्णालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शासकीय व अनुदानित शैक्षणिक संस्था, आश्रमशाळा, वसतिगृहे, पोलीस कल्याण निधी, शासकीय कार्यालये, जिमखाना तसेच शासनाच्या निकषांनुसार पात्र संस्था अर्ज करू शकतात.
क्रीडांगण विकास अनुदान योजना
या योजनेंतर्गत क्रीडांगण समपातळीकरण, 200 मीटर धावपट्टी, कुंपण, विविध खेळांची प्रमाणित मैदाने, प्रसाधनगृह व चेंजिंग रूम, पिण्याच्या पाण्याची सुविधा, भांडारगृह, फ्लडलाइट, प्रेक्षक गॅलरी, शेड, ड्रेनेज व्यवस्था आदी विकासकामांसाठी कमाल 7 लाख रुपये अनुदान दिले जाते. तसेच क्रीडा साहित्य खरेदीसाठी कमाल 3 लाख रुपये अनुदान उपलब्ध आहे.
या योजनेसाठी ग्रामपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका, जिल्हा परिषद, शासकीय व अनुदानित शाळा, आश्रमशाळा, महाविद्यालये, पोलीस विभाग, स्पोर्ट्स क्लब, ऑफिसर्स क्लब, शासकीय कार्यालये व जिमखाना आदी पात्र आहेत. संबंधित संस्थेकडे स्वतःच्या मालकीची किंवा किमान 30 वर्षांच्या नोंदणीकृत भाडेपट्ट्यानुसार उपलब्ध जागा असणे आवश्यक आहे.
इच्छुक व पात्र संस्थांनी सर्वसाधारण, अनुसूचित जाती, आदिवासी व बिगर आदिवासी घटकांअंतर्गत विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांसह 10 ऑगस्ट 2026 पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, स्टेडियम परिसर, इनडोअर हॉल, नांदेड येथे सादर करावेत.
अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी भैरवनाथ नाईकवाडी यांनी केले आहे.

