कृषि विभागाची धडक कारवाई ; दोन परवाने कायमस्वरुपी रद्द
नांदेड (प्रतिनिधी) :- नायगांव तालुक्यातील शेतकऱ्यांकडून प्राप्त तक्रारी, प्रसिद्ध झालेल्या बातम्या व तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, नांदेड यांनी नायगांव तालुक्यातील सात कृषि सेवा केंद्रांवर कठोर कारवाई करुन त्यांचे खत परवाने सहा महिन्यासाठी निलंबीत केले आहेत.
सात कृषी निविष्ठा केद्रांचे नावे पुढीलप्रमाणे (दशरथ कृषी सेवा केंद्र, केदार कृषी सेवा केंद्र, वसंत अग्रो सर्विस सेंटर, गजानन कृषी सेवा केंद्र, हनुमान कृषी सेवा केंद्र, मातोश्री ॲग्रो एजन्सी, शिवकृपा कृषी सेवा केंद्र, नायगांव) तसेच मे.वर्षा ॲग्रो ट्रेडर्स, खांबाळा ता.मुदखेड, मे.व्यंकटरमणा कृषि सेवा केंद्र, कुरुळा ता.कंधार, मे.तिरुमला कृषि सेवा केंद्र, कुरुळा ता.कंधार केंद्राचे सुनावणीअंती निदर्शनास आलेल्या त्रुटीच्या अनुषंगाने परवाने निलंबीत केले आहेत.
तसेच मे.शिवकृपा कृषि विकास केंद्र , माळकौठा ता.मुदखेड व व्यंकटेश कृषि भांडार नविन मोंढा, नांदेड यांच्या खत वाटपामध्ये गंभीर स्वरुपाच्या त्रुटया आढळल्यामुळे पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल झाल्यामुळे यांचे परवाने कायमस्वरुपी रद्द केले आहेत.
जिल्ह्यामध्ये कुठेही रासायनिक खतांची जादा दराने किंवा विनापरवाना विक्री होत असल्यास अथवा खते उपलब्ध असतांना विक्री करीत नसल्यास तात्काळ कृषी विभागाकडे संपर्क साधावा. तसेच शेतकऱ्यांनी परवानाधारक कृषि निविष्ठा केंद्रातूनच निविष्ठा खरेदी कराव्यात असे आवाहन कृषी विभागामार्फत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

