नांदेड, (प्रतिनिधी) :- राष्ट्रीय खाद्यतेल अभियान (तेलबिया) अंतर्गत मिनी ऑइल मिल/एक्सपेलर (फिल्टर प्रेससह व फिल्टर प्रेसशिवाय) या घटकासाठी इच्छुक वैयक्तिक शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपन्यांनी (FPO/FPC) महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.
राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत या घटकाची अंमलबजावणी कृषी यांत्रिकीकरण उपअभियानाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार करण्यात येणार आहे. लाभार्थी निवडीसाठी महाडीबीटी पोर्टलवर प्राप्त झालेल्या अर्जांमधून प्रथम शेतकरी उत्पादक कंपन्यांना (FPO/FPC) प्राधान्य देण्यात येणार असून, त्यानंतर लक्षांक शिल्लक राहिल्यास वैयक्तिक शेतकऱ्यांना लाभ देण्यात येईल.
नांदेड जिल्ह्यास या योजनेअंतर्गत एकूण 24 युनिट्सचा लक्षांक प्राप्त झाला आहे. त्यापैकी मिनी ऑइल मिल/एक्सपेलर (फिल्टर प्रेससह) या घटकासाठी 12 युनिट्स असून प्रति युनिट रु. 4 लाख इतकी उच्चतम अनुदान मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तसेच मिनी ऑइल मिल/एक्सपेलर (फिल्टर प्रेसशिवाय) या घटकासाठी 12 युनिट्स असून प्रति युनिट रु. 3 लाख इतकी उच्चतम अनुदान मर्यादा आहे.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्पभूधारक, सीमांत शेतकरी व महिला लाभार्थ्यांना युनिटच्या किमतीच्या 50 टक्के किंवा निर्धारित उच्चतम मर्यादेपर्यंत, तर सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना युनिटच्या किमतीच्या 40 टक्के किंवा निर्धारित उच्चतम मर्यादेपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. महाडीबीटी पोर्टलवर ‘प्रथम अर्ज, प्रथम प्राधान्य’ (First Come, First Serve – FCFS) या तत्त्वावर लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुक वैयक्तिक शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपन्यांनी विलंब न करता https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

