नायगावच्या आयटीआय विद्यार्थ्यांनी अनुभवले तहसील कार्यालयाचे कामकाज

‘अमृत संवाद सेतू’ उपक्रमांतर्गत ‘

नांदेड (प्रतिनिधी) :- महाराष्ट्रातील युवक-युवतींना शासकीय कार्यालयीन कामकाजाची प्रत्यक्ष ओळख व्हावी, प्रशासकीय यंत्रणेतील पदे व जबाबदाऱ्या समजून घेता याव्या आणि प्रशासन व नागरिक यांच्यातील संवाद अधिक सुलभ व्हावा, या उद्देशाने ‘अमृत’ (Academy of Maharashtra Research Upliftment and Training) संस्थेच्या वतीने “अमृत संवाद सेतू उपक्रम” राबविण्यात येत आहे. या नाविन्यपूर्ण सामाजिक उपक्रमांतर्गत २५ जून २०२६ रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), नायगाव येथील विद्यार्थ्यांना तहसील कार्यालय, नायगाव येथे अभ्यास दौऱ्यावर घेऊन जाण्यात आले.

या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना कार्यालयातील प्रत्येक विभागाची सविस्तर आणि प्रत्यक्ष माहिती देण्यात आली. वित्त विभाग, महसूल १ व २, अभिलेख (रेकॉर्ड रूम), लेखा विभाग आणि आवक-जावक विभागाच्या प्रमुखांनी विद्यार्थ्यांना विभागाच्या कामकाजाची अतिशय महत्त्वाची माहिती देऊन मार्गदर्शन केले.

तहसीलदारांकडून कौतुक व मार्गदर्शन
दौऱ्याच्या शेवटी तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शासकीय कार्यालयांची भीती मनातून काढून एक जबाबदार नागरिक बनण्याचे आवाहन त्यांनी युवकांना केले. युवकांना प्रशासनाशी जोडणाऱ्या या उपक्रमाबद्दल ‘अमृत’ संस्थेचे मनापासून अभिनंदन करत त्यांनी अत्यंत आनंद व्यक्त केला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आपले अनेक प्रश्न प्रशासनासमोर मांडता आले आणि त्यांची उत्तरेही मिळाली.
प्रमुख उपस्थिती
या प्रसंगी अमृत संस्थेचे विभागीय उपव्यवस्थापक ओमकार शेटे, अमृत नांदेडचे जिल्हा व्यवस्थापक सौरभ कुलकर्णी, आयटीआय नायगावचे प्राचार्य पांडुरंग अन्नपुर्णे, उपप्राचार्य तोडकर, संस्थेचे आयएमसी (IMC) सदस्य लक्ष्मण बुद्धलवाड यांच्यासह गट निदेशक आणि ४० विद्यार्थी उपस्थित होते.

हा संपूर्ण उपक्रम यशस्वी करण्यासाठी अमृत नांदेडचे उपजिल्हाव्यवस्थापक विश्वेश्वर जोशी यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या नेटके नियोजनामुळे विद्यार्थ्यांना प्रशासकीय कामकाजाचा हा सुवर्ण अनुभव घेता आला. प्रशासकीय यंत्रणा इतक्या जवळून अनुभवता आल्याबद्दल आयटीआय नायगावचे प्राचार्य, सर्व स्टाफ आणि विद्यार्थ्यांनी ‘अमृत’ संस्थेचे मनःपूर्वक आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *