एल-निनोच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाची जनजागृती मोहीम
नांदेड (प्रतिनिधी) :- यावर्षी एल-निनो या हवामान घटकाचा प्रभाव राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला असून, कमी पाऊस व पावसातील खंडामुळे दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी विशेष जनजागृती मोहीम सुरू केली आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार जूनमध्ये सौम्य, जुलै-ऑगस्टमध्ये मध्यम तर सप्टेंबरमध्ये तीव्र स्वरूपाचा एल-निनो राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करता किमान 80 ते 100 मि.मी. पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
सहायक कृषी अधिकारी गावनिहाय पावसाचे प्रमाण व जमिनीतील ओलाव्याची पाहणी करून त्यानुसार पेरणीबाबत मार्गदर्शन करणार आहेत. दुबार पेरणी टाळण्यासाठी शेतकऱ्यांना योग्य वेळी सल्ला दिला जाणार आहे.
पावसातील अनिश्चितता लक्षात घेऊन तुर- सोयाबीन आंतरपीक पद्धतीचा अवलंब करण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. तसेच उताराला आडवी पेरणी, रुंद सरी-वरंबा पद्धत, बेड मेकरद्वारे लागवड आणि कमी कालावधीच्या वाणांचा वापर यांसारख्या तंत्रज्ञानाची माहिती दिली जात आहे. सोयाबीनसाठी MAUS-725, JS-9305 तर तुरीसाठी BDN-711 व गोदावरी या वाणांची शिफारस करण्यात आली आहे.
याशिवाय जैविक खतांचा वापर, बीजप्रक्रिया, सापळा पिके, पिवळे चिकट सापळे, पक्षीथांबे आणि नैसर्गिक शेती यांसारख्या कमी खर्चिक उपाययोजनांबाबतही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे.
ही माहिती नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक गावात सकाळ-सायंकाळ फिरत्या लाउडस्पीकरद्वारे सहायक कृषी अधिकारी, एटीएम आणि बीटीएम यांच्या माध्यमातून पोहोचवली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळणे सोपे होत आहे.
दरम्यान, ‘महाविस्तार 2.0’ ॲपद्वारे शेतकऱ्यांना हवामानविषयक सल्ला, कीड-रोग व्यवस्थापन आणि तज्ज्ञांशी थेट संपर्काची सुविधा उपलब्ध झाली आहे. जिल्ह्यात सध्या सुमारे 1 लाख 33 हजार शेतकरी हे ॲप वापरत आहेत.
“शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या सल्ल्यानुसारच पेरणी करावी आणि दुबार पेरणी टाळावी,” असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

