शेतकरी, सामान्य नागरिकांपर्यंत जास्तीत जास्त योजना पोहोचवा- महापौर

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न; मान्यवरांच्या हस्ते विविध लाभार्थ्यांना लाभाचे वितरण

नांदेड, (प्रतिनिधी) : राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाच्या माध्यमातून शेतकरी, सामान्य नागरिक तसेच विविध घटकांपर्यंत शासनाच्या योजना प्रभावीपणे पोहोचविण्याचे काम सुरू आहे. या अभियानामुळे नागरिकांना एकाच ठिकाणी विविध योजनांचा लाभ मिळत असून शासन आणि जनतेतील दुवा अधिक मजबूत होत आहे, असे प्रतिपादन नांदेडच्या महापौर कविता मुळे यांनी केले.

नांदेड तहसील कार्यालयात आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात त्या बोलत होत्या. यावेळी आमदार आनंदराव बोंढारकर, आमदार बालाजीराव कल्याणकर, उपमहापौर दीपकसिंह रावत, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, अपर जिल्हाधिकारी रत्नदीप गायकवाड, तहसीलदार संजय वारकड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

महापौर कविता मुळे म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराजांनी जनकल्याणाला सर्वोच्च प्राधान्य दिले होते. त्याच प्रेरणेने महसूल विभाग आणि इतर शासकीय यंत्रणा नागरिकांची कामे जलदगतीने मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील आहेत. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत योजनांची माहिती आणि प्रत्यक्ष लाभ पोहोचविण्याचे काम या अभियानातून प्रभावीपणे होत असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार आनंदराव बोंढारकर यांनी “शासन आपल्या दारी” या संकल्पनेचा उल्लेख करत सांगितले की, शासनाने नागरिकांना थेट लाभ देण्यासाठी विविध उपक्रम राबविले आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली लोकाभिमुख निर्णय घेतले जात असून या शिबिरांमुळे नागरिकांचे प्रश्न जागेवर सोडवले जात आहेत. लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ तत्काळ देण्यात येत असल्याने प्रशासनाविषयीचा विश्वास अधिक दृढ होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

आमदार बालाजी कल्याणकर यांनी सांगितले की, नांदेड तहसील कार्यालयाने आतापर्यंत आठ मंडळांमध्ये महाराजस्व समाधान शिबिरे आयोजित केली आहेत. या शिबिरांच्या माध्यमातून अधिकारी थेट गावांमध्ये जाऊन लाभार्थ्यांना सेवा आणि योजनांचे लाभ देत आहेत. त्यामुळे नागरिकांचा वेळ, पैसा आणि कार्यालयीन त्रास मोठ्या प्रमाणात कमी झाला असून आतापर्यंत सुमारे २५ हजार लाभार्थ्यांनी या अभियानाचा लाभ घेतल्याची माहिती त्यांनी दिली.

एजंटांच्या माध्यमातून नव्हे, थेट प्रशासनाशी संपर्क साधा- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेताना कोणत्याही मध्यस्थ किंवा एजंटांच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन केले. प्रशासनाकडून थेट सेवा देण्यावर भर दिला जात असून नागरिकांनी अधिकृत माध्यमातूनच अर्ज आणि संपर्क साधावा, असे त्यांनी स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले की, जिल्ह्यात “आपले सरकार सेवा केंद्र” अधिक सक्षम करण्यात येत असून ग्रामपंचायत स्तरावर सुमारे ५०० सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांना तालुका किंवा जिल्हा स्तरावर वारंवार फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही.

शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेल्या ट्रॅक्टरचा योग्य आणि उत्पादनक्षम वापर करावा, असे आवाहन करताना त्यांनी ट्रॅक्टरसोबत श्रेडर मशीनचा वापर केल्यास शेतीत अधिक फायदा होईल, असे सांगितले. तसेच रासायनिक खतांचा अतिरेक टाळून सेंद्रिय शेतीकडे वळण्याचेही त्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले.

उपमहापौर दीपकसिंह रावत यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, एकाच छताखाली विविध शासकीय योजनांचे लाभ उपलब्ध होत असल्याने नागरिकांचा वेळ आणि खर्च वाचत आहे. महसूल विभागाने अशा प्रकारची शिबिरे सातत्याने आयोजित करावीत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार संजय वारकड यांनी केले. त्यांनी सांगितले की, आतापर्यत नांदेड तालुक्यात विविध महसूल मंडळामध्ये ८ शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून आजचे 9 वे शिबिर हे शेवटचे अंतिम शिबिर आहे. या शिबिराच्या माध्यमातून अनेक लाभार्थ्यांना विविध विभागचे लाभ त्यांच्या गावात जावून देण्यात आले आहेत. तसेच नागरिकांना तहसिल कार्यालयात कामासाठी फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासू नये यासाठी नांदेड तहसील कार्यालय पूर्णपणे डिजिटल करण्यात आले असून प्रत्येक सेवेसाठी क्यूआर कोड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. नागरिक हे क्यूआर कोड स्कॅन करून मोबाईलवरूनच विविध सेवांची माहिती सहज मिळवू शकतात. मागील दहा महिन्यांत सुमारे ३९ हजार नागरिकांना घरबसल्या सेवा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाशवाणी नांदेड केंद्राच्या निवेदिका राजश्री मिरजकर यांनी केले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते डिजिटल सातबारा उपलब्ध करून देणाऱ्या क्यूआर कोड सुविधेचे उद्घाटन करण्यात आले. तसेच विविध योजनांतील लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे, साहित्य आणि इतर लाभांचे वितरण करण्यात आले.

नांदेड तालुक्यात आतापर्यत तुप्पा, लिंबगाव, विष्णूपुरी, नाळेश्वर, नांदेड ग्राामीण, वाजेगाव, तरोडा बु, वसरणी, नांदेड शहर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिरात एकूण वितरीत प्रमाणपत्रे व देण्यात आलेल्या महसूलसह इतर विभागांच्या सेवा याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

फेरफार-३ हजार ८०४, सातबारा दुरुस्ती व निकाली-२४४, डिजीटल सातबारा-७ हजार ५५७, आठ-अ- ६ हजार ४४३, विविध प्रमाणपत्रे- ६ हजार ३८९, इतर अर्जावर निर्णय-४७४, भूसंपादन कमी जास्त प्रमाणपत्र-१९, कृषी प्रकरणात केलेले कमी जास्त पत्रक-७५, जिवंत सातबारा मोहिम उपलब्ध कागदपत्र-१८२, ॲग्रीस्टॅक कार्ड-२९६ असे एकूण २५ हजार ४८७ प्रमाणपत्र व सेवा उपलबध करुन देण्यात आल्या.

याशिवाय आयुष्यमान भारत कार्ड १ हजार ३४९, आरोग्य तपासणी २ हजार ६१०, कृषी ट्रॅक्टर वाटप- ३८, रोटाव्हेटर-४, कल्टीवेटर- ३ इत्यादीचे वितरण या शिबिरांच्या माध्यमातून करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *