वेठबिगार मजुरी निर्मूलनासाठी केंद्र शासनाची सुधारीत SOP लागू ; जनजागृती-अंमलबजावणीस प्रशासन सज्ज

नांदेड (प्रतिनिधी) :- जिल्ह्यात वेठबिगार मजुरी पद्धती (निर्मूलन) अधिनियम 1976 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र शासनाने 14 मे 2026 रोजी जारी केलेल्या सुधारीत मानक कार्यपद्धती (Standard Operating Procedure – SOP) ची व्यापक प्रसिद्धी व अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.

वेठबिगार मजुरी पद्धती (निर्मूलन) अधिनियम 1976 नुसार वेठबिगार मजुरी पद्धत पूर्णपणे बेकायदेशीर घोषित करण्यात आली असून अशा पद्धतीतून निर्माण झालेली सर्व प्रकारची बंधने व कर्जे समाप्त मानली जातात. एखाद्या व्यक्तीकडून कर्ज, सामाजिक बंधने, जातीय दबाव, परंपरा किंवा अन्य कोणत्याही कारणास्तव सक्तीने अथवा विनामोबदला काम करून घेणे हा कायद्याने दंडनीय गुन्हा आहे.

केंद्र शासनाच्या सुधारीत SOP मध्ये वेठबिगार मजुरांची ओळख, तात्काळ सुटका, संरक्षण, पुनर्वसन, आर्थिक सहाय्य, कायदेशीर कारवाई तसेच विविध विभागांमधील समन्वय याबाबत स्पष्ट कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. वेठबिगार मजुरांची ओळख पटताच त्यांची तात्काळ मुक्तता, सुरक्षित निवारा, अन्न, वैद्यकीय मदत, कायदेशीर सहाय्य व पुनर्वसनाच्या उपाययोजना त्वरित राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

कामगार विभागाची भूमिका
वेठबिगार मजुरी निर्मूलनाच्या कार्यात कामगार विभागाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून विभागामार्फत विविध क्षेत्रांमध्ये विशेष पाहणी व जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. वीटभट्ट्या, ऊसतोडणी, बांधकाम क्षेत्र, खाणकाम, कृषी क्षेत्र तसेच असंघटित क्षेत्रातील कामगारांची परिस्थिती नियमितपणे तपासली जात आहे.

कामगार विभागामार्फत संबंधित अधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी, कामगार संघटना, स्वयंसेवी संस्था व नागरिक यांना वेठबिगार मजुरीची लक्षणे, कायदेशीर तरतुदी व तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. तसेच संशयित प्रकरणांची माहिती संबंधित जिल्हा प्रशासन, महसूल व पोलीस विभागास उपलब्ध करून देण्यात येत आहे.

इतर विभागांची भूमिका
महसूल विभागामार्फत जिल्हा व तालुका स्तरावरील दक्षता समित्यांचे समन्वयन, बचाव मोहिमांचे नेतृत्व व पुनर्वसन प्रक्रियेवर देखरेख केली जाते. पोलीस विभागामार्फत गुन्ह्यांची नोंद, तपास व दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाते. महिला व बाल विकास विभाग, तसेच इतर संबंधित यंत्रणा पुनर्वसन व कल्याणकारी योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्यासाठी समन्वयाने कार्य करतात.

दक्षता समित्यांना बळकटी
सुधारीत SOP नुसार जिल्हा व उपविभागीय स्तरावरील दक्षता समित्यांना अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला आहे. ग्रामपंचायत व तालुका स्तरावर जनजागृती कार्यशाळा घेऊन वेठबिगार मजुरीची ओळख व प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती दिली जाणार आहे.

नागरिकांना आवाहन
नागरिकांनी आपल्या परिसरात कोणत्याही व्यक्तीकडून सक्तीने काम करून घेतले जात असल्याचे, कर्जाच्या मोबदल्यात मजुरी करण्यास भाग पाडले जात असल्याचे किंवा वेठबिगार मजुरीचे कोणतेही स्वरूप आढळून आल्यास त्याची माहिती तात्काळ कामगार विभाग , तहसील कार्यालय, किंवा पोलीस प्रशासनास द्यावी.

वेठबिगार मजुरीमुक्त समाज निर्माण करण्यासाठी नागरिक, स्वयंसेवी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था व सर्व शासकीय विभागांनी सक्रिय सहभाग नोंदवून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने नांदेड जिल्ह्यातील सहायक कामगार आयुक्त, आशिष ढवळे यांचेकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *