नांदेड (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र विधान परिषदेच्या नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या व्दिवार्षीक निवडणूक-२०२६ ची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, निष्पक्ष आणि शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश निवडणूक निरीक्षक डॉ. माधवी खोडे-चवरे यांनी दिले.
जिल्हा नियोजन भवन येथे या निवडणुकीच्या मतदान व मतमोजणीच्या अनुषंगाने आयोजित दुसऱ्या प्रशिक्षणात त्या बोलत होत्या.
प्रशिक्षणाला जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल कर्डिले, अप्पर जिल्हाधिकारी रत्नदिप गायकवाड, सहा.निवडणूक निर्णय अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांच्यासह विविध कक्षाचे नोडल अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
निवडणूक कामांबाबत मतदारांची कोणतीही तक्रार येणार नाही यासाठी आपण दक्ष राहिले पाहिजे. आपल्याकडे निवडणूक कामांचा मोठा अनुभव असला तरी अतिआत्मविश्वास न बाळगता निवडणूक आयोगाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे. निवडणूक प्रक्रियेत आपल्या हातून कोणतीही चूक होणार नाही याची संपूर्ण दक्षता सर्वांनी घ्यावी. निवडणूक कर्तव्य बजावतांना समाज माध्यमाचा वापर अत्यंत काळजीपूर्वक व जबाबदारीने करावा, अशी सूचना निवडणूक निरीक्षक डॉ. माधवी खोडे-चवरे यांनी केली.
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक पार पाडण्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. मतदान व मतमोजणी केंद्रावर सुरक्षेच्यादृष्टिने सर्वांनी खबरदारी घ्यावी, असे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी स्पष्ट केले.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदिप गायकवाड यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने विविध विषयांवर मार्गदर्शन केले तर उपविभागीय अधिकारी प्रविण मेंगशेट्टी यांनी सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती दिली.
योग्य पद्धतीने मतपेटी हाताळण्याबाबतचे प्रशिक्षण यावेळी देण्यात आले. या निवडणुकीचे मतदान गुरुवार १८ जून २०२६ रोजी संबंधित महसूल उपविभागाच्या मुख्यालयी असलेल्या तहसिल कार्यालयात होणार असून या मतदानाची मोजणी सोमवार २२ जून २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जिल्हा नियोजन भवन येथे होणार आहे.

