नांदेड येथे पीएलएफएस व एएसयुएसई राष्ट्रीय सर्वेक्षणाचा शुभारंभ; नागरिकांनी सर्वेक्षणास सहकार्य करावे – डॉ. रत्नदीप गायकवाड

नांदेड (प्रतिनिधी) : सांख्यिकी आणि कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालय (MoSPI), भारत सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जागतिक बँकेच्या सहाय्याने महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागामार्फत MahaSTRIDE प्रकल्पांतर्गत राज्यात जून २०२६ ते मार्च २०२७ या कालावधीत नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण (PLFS) आणि असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण (ASUSE) राबविण्यात येणार आहे.

या सर्वेक्षणांच्या कामाचा शुभारंभ आज जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदीप गायकवाड यांच्या हस्ते माहितीपत्रकाचे विमोचन करून करण्यात आला.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, सांख्यिकी अधिकारी श्रीमती प्रज्ञा पांढरे तसेच अन्वेषक आणि पर्यवेक्षक उपस्थित होते.

केंद्र शासनाच्या धर्तीवर अर्थ व सांख्यिकी आयुक्तालय, नियोजन विभाग, महाराष्ट्र शासन या सर्वेक्षणात सहभागी होत आहे. या सर्वेक्षणातून मिळणारी आकडेवारी शासनाच्या विविध योजना आणि धोरणे तयार करण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.

PLFS सर्वेक्षणातून रोजगार-बेरोजगारी, महिला कामगारांचा सहभाग, स्वयंरोजगार आणि असंघटित रोजगार याबाबत अद्ययावत व विश्वासार्ह माहिती उपलब्ध होणार आहे.

ASUSE सर्वेक्षणातून उत्पादन (Manufacturing), व्यापार (Trade) आणि सेवा (Services) क्षेत्रातील (बांधकाम क्षेत्र वगळून) असंघटित उद्यमांची संख्या, रोजगाराचे प्रकार (पगारी/स्वयंरोजगारी), कार्यरत कामगारांची संख्या, प्रति कामगार व प्रति उद्यम स्थूल मूल्यवृद्धी (GVA), उत्पादकता आणि वेतन यांसारख्या महत्त्वपूर्ण आर्थिक निर्देशकांची माहिती प्राप्त होणार आहे.

या माहितीच्या आधारे राज्य व जिल्हा उत्पन्नाचा अंदाज बांधणे तसेच शासनाच्या नियोजन व धोरणनिर्मितीस मदत होणार असल्याचे अपर जिल्हाधिकारी डॉ. गायकवाड यांनी सांगितले. त्यांनी नागरिकांना सर्वेक्षणासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.

सर्वेक्षणासाठी अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयामार्फत Ipsos Research Private Limited या संस्थेने नियुक्त केलेले अन्वेषक व पर्यवेक्षक निवडक नमुना पद्धतीने निवडलेल्या कुटुंबे आणि उद्योगांना भेट देऊन मुलाखतीद्वारे माहिती संकलित करणार आहेत. संकलित करण्यात येणारी वैयक्तिक माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येणार आहे.

सर्वेक्षणासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना योग्य व परिपूर्ण माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदीप गायकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर चिंचाणे आणि जिल्हा सांख्यिकी कार्यालयाच्या वतीने सांख्यिकी अधिकारी श्रीमती प्रज्ञा पांढरे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *