जिल्हा टास्क फोर्स व सुकाणू समितीची आढावा बैठक संपन्न; जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर राबवणार जनजागृती मोहीम
नांदेड (प्रतिनिधी) :- आगामी २८ जून २०२६ रोजी जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या आणि स्टॉप डायरिया कॅम्पेन २०२६’ (STOP Diarrhoea Campaign 2026) च्या पूर्वतयारीसाठी जिल्हा कार्य बल गट (टास्क फोर्स) व जिल्हा सुकाणू समितीची महत्त्वपूर्ण आढावा बैठक अप्पर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदीप गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीत राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम शंभर टक्के यशस्वी करणे, ग्रामीण व शहरी भागात मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे आणि आरोग्य विभागाच्या इतर विविध राष्ट्रीय कार्यक्रमांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
या बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी, माता बाल संगोपन अधिकारी डॉ. संतोष नवले, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. बुटे यांच्यासह जिल्हा सुकाणू समिती आणि कार्य बल गटाचे सर्व सदस्य उपस्थित होते.
पोलिओ मोहिमेचे उद्दिष्ट व सूक्ष्म नियोजन (नांदेड जिल्हा):
बैठकीत आगामी २८ जून रोजी होणाऱ्या पल्स पोलिओ मोहिमेच्या उद्दिष्टांचे अधिकृत सादरीकरण करण्यात आले. त्यानुसार नांदेड जिल्ह्यात एकूण ३,८८,५२६ बालकांना पोलिओचा डोस पाजण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये ग्रामीण भागातील २,४८,७२८, शहरी भागातील ४६,९४३ आणि महानगरपालिका (मनपा) क्षेत्रातील ९२,८५५ अपेक्षित लाभार्थ्यांचा समावेश आहे. मोहिमेच्या यशस्वीतेसाठी जिल्ह्यात खालीलप्रमाणे चोख नियोजन करण्यात आले आहे.
एकूण पोलिओ बूथ संख्या: २,८४३ (ग्रामीण: २,२८३, शहरी: २७५, मनपा: २८५)
अपेक्षित एकूण मनुष्यबळ: ७,४३१ कर्मचारी
एकूण पर्यवेक्षक (Supervisors): ६४३
*गृहभेटीसाठी निश्चित केलेली घरे (IPPI): ७,५५,३७९ घरे
गृहभेटीसाठी आवश्यक टीम: १,४१५ टीम्स
ट्रान्झिट टीम (रेल्वे स्टेशन, बस स्थानके व चेकपोस्ट): २७७ टीम्स
मोबाईल टीम (दुर्गम व स्थलांतरित भागांसाठी): १८७ टीम्स
‘STOP Diarrhoea Campaign 2026’ व व्यापक जनजागृती मोहीम:
राज्य कुटुंब कल्याण कार्यालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यात १६ जून ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत ‘स्टॉप डायरिया कॅम्पेन’ राबविले जाणार असून, १ ते १५ जून दरम्यान त्याची पूर्वतयारी केली जात आहे. ५ वर्षांखालील बालकांमध्ये अतिसारामुळे (डायरिया) होणारे बालमृत्यू शून्य करणे हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
या मोहिमेअंतर्गत आशा स्वयंसेविका आणि आरोग्य सेवकांमार्फत घराघरांमध्ये ओआरएस (ORS) आणि झिंक गोळ्यांचे वाटप केले जाईल. या मोहिमेला लोक चळवळीचे स्वरूप देण्यासाठी नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भिंतीपत्रके, दवंडी, सोशल मीडिया आणि मेळाव्यांच्या माध्यमातून व्यापक प्रमाणावर जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संतोष सूर्यवंशी यांनी दिली आहे.
इतर आरोग्य विषयांचा आढावा:
पल्स पोलिओ व अतिसार मोहिमेसोबतच बैठकीत नियमित लसीकरण (Routine Immunization), आयडीएसपी (IDSP-एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रम), एचपीव्ही (HPV-गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग प्रतिबंधक लस) आणि एचआयव्ही (HIV) प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.
अप्पर जिल्हाधिकारी डॉ. गायकवाड यांनी सर्व संबंधित यंत्रणांना समन्वय ठेवून सूक्ष्म आराखड्यानुसार काम करण्याचे आणि रेल्वे स्टेशन, बस स्थानके व चेकपोस्टवर ट्रान्झिट टीमच्या माध्यमातून एकही बालक डोसपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी व माता-पित्यांनी आपल्या ० ते ५ वर्षांपर्यंतच्या बालकांना २८ जून रोजी पोलिओ बूथवर नेऊन डोस पाजावा व राष्ट्रीय मोहिमेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन माता बाल संगोपन अधिकारी डॉ.संतोष नवले यांनी केले आहे .

