नांदेड (प्रतिनिधी) :- एका वृत्तपत्रातील २७ जून २०२६ रोजी “खतामध्ये वाळूची भेसळ” बातमीच्या व शेतकऱ्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने तालुका कृषी अधिकारी कार्यालय उमरीचे कृषी अधिकारी (गुनि) आर.के. लखमोड व पंचायत समिती कार्यालय उमरीचे कृषी अधिकारी (गुनि) जोंधळे ए.सी. यांनी मातोश्री ऍग्रो एजन्सी, उमरी या कृषि निविष्ठा केंद्राची तपासणी केली.
तक्रारीतील उल्लेखीत क्लासवन ॲग्रो बायोटेक अँड फर्टीलायझर प्रायव्हेट लिमिटेड, येळावी, तालुका तासगाव, जिल्हा सांगली या खत उत्पादक कंपनीचे क्लास वन झिंकेटेड सिंगल सुपर फॉस्फेट दाणेदार खताची प्रत्यक्षात पाहणी केली. सदर खतामध्ये कुठलेही वाळूचे व रेतीचे कण आढळून आले नाहीत. तसेच खताचे दाणे फोडून बधितले असता त्याचे बारीक पीठ झाले. त्यामुळे या खतामध्ये वाळूची भेसळ नसल्याचे प्राथमिक दृष्टया कृषी अधिकारी (गुनि), तालुका कृषी अधिकारी कार्यालय, उमरी व कृषी अधिकारी (गुनि), पंचायत समिती कार्यालय, उमरी यांना आढळून आले आहे.
तसेच सदरील खताचे नमुने घेऊन तपासणीसाठी फर्टीलायझर टेस्टिंग लॅबरोटरी, छत्रपती संभाजीनगर या प्रयोगशाळेस विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत. सदरील रासायनिक खत कंपनी ही कृषि आयुक्तालयाचे राज्यस्तरीय खत उत्पादन परवानाधारक कंपनी आहे.
तरी जिल्ह्यामध्ये अनधिकृत खत विक्री होत असल्यास, रासायनिक खतांची जादा दराने किंवा विनापरवाना विक्री होत असेल अथवा खते उपलब्ध असतांना विक्री करत नसल्यास तात्काळ कृषी विभागाकडे संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

