सामाजिक न्याय दिनानिमित्त नांदेड येथे २६ जून रोजी समता दिंडीचे आयोजन

नांदेड (प्रतिनिधी) :- संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सामाजिक न्याय विभागामार्फत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिन २६ जून हा दिवस “सामाजिक न्याय दिन” म्हणून साजरा करण्याबाबत शासनाचे निर्देश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नांदेड कार्यालयामार्फत सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात येत आहे.

या निमित्ताने नांदेड जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थी, शालेय विद्यार्थी तसेच नागरिकांसाठी दि. २६ जून २०२६ रोजी सकाळी ०८ वाजता राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त समता दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे.

समता दिंडीची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात येईल. दिंडीचा मार्ग महात्मा ज्योतिबा फुले पुतळा, स्नेहनगर ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुतळा असा राहणार असून, राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुतळा येथे दिंडीचा समारोप होईल.

या समता दिंडीत नांदेड जिल्ह्यातील महाविद्यालये, शाळांतील विद्यार्थी तसेच नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन शिवानंद मिनगिरे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नांदेड यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *