नांदेड जिल्ह्यात खरीप साठी मुबलक खत साठा उपलब्ध

नांदेड ( प्रतिनिधी ) :- खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांच्या दृष्टीने खत ही सर्वात महत्त्वाची निविष्ठा असते. राज्य पातळीवर खताचे नियोजन कृषी आयुक्तालय, पुणे येथून होत असते. कृषी आयुक्तालयाकडून खरीप हंगामाच्या सुरवातीलाच जिल्ह्यासाठीचे खताचे आवंटन कळवले जाते. नांदेड जिल्ह्याला खरीप हंगामासाठी दरवर्षी सरासरी 2 लाख मेट्रिक टन खतांची आवश्यकता असते. खरीप हंगाम 2026 साठी नांदेड जिल्ह्याला सुमारे 2,11,500 मे.टन इतके खत आवंटन प्राप्त झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने 60,200 मे. टन युरिया, 32300 मे. टन डीएपी व 85300 मे. टन संयुक्त खते यांचा समावेश आहे.

मागील वर्षीची शिल्लक व यावर्षी 1 एप्रिल पासून आजतागायत झालेला पुरवठा याचा अभ्यास केल्यास बाजारात 31,098 मे. टन युरिया होता. पैकी 1 एप्रिलपासून आज अखेर 14,597 मे. टन युरिया ची विक्री झाली असून 16,502 मे. टन युरिया मार्केट मध्ये उपलब्ध आहे. 19,275 मे. टन डीएपी पैकी 7,600 मे. टन विक्री झाली असून आज बाजारात 11,674 मे. टन डीएपी खत उपलब्ध आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे डीएपी सारखे खत आवश्यकतेपेक्षा थोडे कमी उपलब्ध असले तरीही 20:20:0:13, 12:32:16 यासारखे संयुक्त खतांचे पर्याय शेतकऱ्यांना वापरता येतील. सद्यस्थितीत 67,000 मे. टन संयुक्त खता सहित एकूण 1,25,500 मे. टन खते बाजारात उपलब्ध आहेत.

टंचाईसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यास शेतकऱ्यांना सुलभ खत पुरवठा होण्याच्या दृष्टीने ‘बफर स्टॉक’ म्हणजेच संरक्षित खतसाठा निर्माण केलेला आहे. आज रोजी यामध्ये 4,028 मे. टन युरिया व 1,485 मे. टन डीएपी खत उपलब्ध आहे.
त्यामुळे कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की, आपण कृषी विद्यापीठाच्या शिफारसीत खतमात्रानुसार, जमीन आरोग्य पत्रिका अहवालानुसार तसेच पीक वाढीच्या टप्प्यानुसार खत खरेदी करावे.

शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये व खत तुटवड्याच्या भीतीपोटी अनावश्यक खत खरेदी करू नये. खते उपलब्ध होण्यात अडथळा निर्माण झाल्यास, वाजवीपेक्षा जास्त दरात खत विक्री होत असल्यास, खतामध्ये कोणत्याही प्रकारची लिंकिंग होत असल्यास अथवा बोगस खतांची विक्री होत असल्यास तात्काळ कृषी विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *