११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान जनजातीय गौरव दिन सेवा सप्ताह ;आदिवासी बांधवांना गावातच शासकीय योजनांचा लाभ मिळणार

किनवट, माहूरसह आदिवासीबहुल गावांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन; आरोग्य तपासणी, दाखले वाटप, योजनांची नोंदणी व जनजागृतीवर भर…

नांदेड, (प्रतिनिधी) :- क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त १५ नोव्हेंबर हा दिवस देशभरात जनजातीय गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने आदिवासी समाजाचे हक्क, जल-जंगल-जमीन यांचे संरक्षण तसेच भगवान बिरसा मुंडा यांचे कार्य, त्याग आणि संघर्ष नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, किनवट यांच्या कार्यक्षेत्रात ११ ते १८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत जनजातीय गौरव दिन सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

या सेवा सप्ताहाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना विविध शासकीय योजनांचा लाभ त्यांच्या गावात व वस्त्यांमध्येच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पात्र लाभार्थ्यांना शासकीय सेवांचा लाभ मिळावा, दाखले व प्रमाणपत्रांचे वाटप व्हावे आणि कोणताही पात्र लाभार्थी योजनांपासून वंचित राहू नये, या उद्देशाने विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

असे आहेत सप्ताहातील प्रमुख उपक्रम :

११ नोव्हेंबर : जिल्हास्तरीय माहिती व जनजागृती मोहीम राबविण्यात येणार असून, अधिकृत माहितीपत्रके व जनजागृती साहित्याचा प्रसार केला जाणार आहे.

१२ नोव्हेंबर : किनवट व माहूर तालुक्यांमध्ये जनजागृती व प्रसिद्धी मोहीम, उद्बोधन आणि माहिती साहित्याचे वितरण करण्यात येणार आहे.

१३ नोव्हेंबर : जवरला व कोलामपोड येथे विशेष सेवा शिबिरांचे आयोजन करून जातीचे प्रमाणपत्र, आधार कार्ड व अन्य आवश्यक दाखल्यांचे वाटप, प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान (पीएम-जनमन), आदिम जमाती विकास योजना आदींच्या लाभार्थ्यांची नोंदणी व लाभ वितरण करण्यात येणार आहे. तसेच महिला बचत गटांना मार्गदर्शन केले जाणार आहे.

१४ नोव्हेंबर : आदिवासी महापुरुषांच्या स्मारकांची स्वच्छता, सुशोभीकरण आणि दीपोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.

१५ नोव्हेंबर : भगवान बिरसा मुंडा जयंती तथा जनजातीय गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाचा आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच अभिवादन व सत्कार कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.

१६ नोव्हेंबर : आदिवासी वस्त्यांमध्ये विशेष सेवा शिबिरे घेऊन आधार नोंदणी व अद्ययावतीकरण, जातीचे प्रमाणपत्र वाटप, घरकुल योजनांचा आढावा, प्रधानमंत्री जनमन घरकुल योजना तसेच वनहक्क कायद्यांतर्गत योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

१७ नोव्हेंबर : कोलाम या विशेष दुर्बल आदिम जमातीसाठी विशेष शिबिर आयोजित करून शासकीय दाखल्यांचे वाटप, आरोग्य तपासणी, महिला बचत गटांना मार्गदर्शन, बँक कर्ज मंजुरी व शिष्यवृत्ती योजनांची माहिती देण्यात येणार आहे. तसेच असंसर्गजन्य आजारांबाबत जनजागृती केली जाणार आहे.

१८ नोव्हेंबर : सेवा सप्ताहाचा समारोप व सर्वंकष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. युवक-युवतींसाठी पोलीस भरती प्रशिक्षण, स्पर्धा परीक्षा व करिअर मार्गदर्शन, नवीन शिधापत्रिका वाटप, डिजिटल व्यवहार आणि आर्थिक साक्षरतेबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

हा सेवा सप्ताह यशस्वी करण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, किनवट कार्यालयामार्फत संबंधित शासकीय विभागांशी समन्वय साधण्यात येत आहे. विविध विभागांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कार्यक्रमांच्या अंमलबजावणीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

किनवट, माहूर तसेच प्रकल्प कार्यक्षेत्रातील सर्व आदिवासी नागरिक, महिला, युवक-युवती, शेतकरी आणि विद्यार्थ्यांनी या सेवा सप्ताहात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून शासकीय योजनांचे लाभ, दाखले वाटप शिबिरे, आरोग्य तपासणी आणि इतर उपलब्ध सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी, नांदेड व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, किनवट यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *