दिवाळी प्रवासात जादा भाडे आकारणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स विरुद्ध तक्रार करा

प्रवाशांनी तिकीट, भाड्याचा पुरावा जतन करण्याचे प्रादेशिक परिवहन विभागाचे आवाहन

नांदेड, (प्रतिनिधी) :- दिवाळी सण व सुट्यांच्या कालावधीत प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता खासगी ट्रॅव्हल्स बसमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी निर्धारित भाड्यापेक्षा जादा भाडे आकारले जात असल्यास संबंधितांविरुद्ध तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बससेवेसाठी शासन किंवा सक्षम प्राधिकरणाने लागू केलेल्या विशेष सणकालीन भाडेवाढीच्या तरतुदीनुसार नियमित भाड्याच्या दीडपट (१.५ पट) भाडे आकारण्यास परवानगी आहे. मात्र कोणत्याही खासगी ट्रॅव्हल्सना मनमानी पद्धतीने यापेक्षा जादा भाडे आकारण्याचा अधिकार नाही. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासापूर्वी आकारण्यात येणाऱ्या भाड्याची खात्री करूनच तिकीट घ्यावे.

जादा भाडे आकारल्यास तक्रार नोंदवा

खासगी ट्रॅव्हल्सकडून निर्धारित भाड्यापेक्षा जादा रक्कम आकारण्यात आल्यास प्रवाशांनी तात्काळ तक्रार नोंदवावी. तक्रारीसाठी संबंधित ट्रॅव्हल्सचे नाव, बस क्रमांक, प्रवासाचा मार्ग, प्रवासाची तारीख आणि आकारलेले भाडे याची नोंद ठेवणे आवश्यक आहे.

जादा भाडे आकारल्याचा पुरावा म्हणून प्रवासाचे तिकीट व भाडे भरल्याची पावती जतन करावी. तसेच संबंधित ट्रॅव्हल्सचे नाव, बस क्रमांक, प्रवासाचा मार्ग, दिनांक आणि आकारलेले भाडे याबाबतची सविस्तर माहिती तक्रारीसोबत द्यावी.

प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधावा

जादा भाडे आकारणीबाबतची तक्रार प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड येथे नोंदविता येईल. या कार्यालयाचा ई-मेल rto.26-mh@gov.in व दूरध्वनी क्र. ०२४६२-२५९९०० हा असून दिवाळीच्या सुट्यांमध्ये प्रवाशांची गैरसोय होऊ नये तसेच त्यांची आर्थिक लूट होऊ नये यासाठी प्रवाशांनी सहकार्य करावे. प्रवासापूर्वी भाड्याची खात्री करावी आणि निर्धारित भाड्यापेक्षा जादा आकारणी होत असल्यास तात्काळ तक्रार नोंदवावी, असेही आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *