पात्र शेतकऱ्यांना विनाविलंब पीक कर्ज द्या – जिल्हाधिकारी

• नेरली येथील भारतीय स्टेट बँकेला अचानक भेट
• अनावश्यक कागदपत्रांची मागणी टाळण्याचे बँक अधिकाऱ्यांना निर्देश

नांदेड, (प्रतिनिधी) :- शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळविताना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, तसेच पात्र शेतकऱ्यांना विनाविलंब कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले. त्यांनी आज नेरली येथील भारतीय स्टेट बँकेला अचानक भेट देऊन पीक कर्ज वितरणासह अन्य कर्ज प्रकरणांचा आढावा घेतला. यावेळी बँकेत उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणीही जाणून घेतल्या.

पीक कर्जासाठी शेतकऱ्यांकडून अनावश्यक कागदपत्रांची मागणी करून त्यांना त्रास देऊ नये. उपलब्ध सुविधांचा वापर करून ऑनलाइन सातबारा उतारा प्राप्त करावा आणि पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज अर्जांवर तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी बँक अधिकाऱ्यांना दिल्या. कर्ज मंजुरीची प्रक्रिया सुलभ करून शेतकऱ्यांना वेळेत कर्ज उपलब्ध होईल, यासाठी आवश्यक दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

जिल्हाधिकाऱ्यांनी बँकेतील प्रलंबित कर्ज प्रकरणे, शेतकऱ्यांकडून प्राप्त अर्ज, आवश्यक कागदपत्रांबाबत निर्माण होणाऱ्या अडचणी आणि त्यावरील संभाव्य उपाययोजनांची माहिती घेतली. सामाईक क्षेत्रातील शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून देताना येणाऱ्या अडचणींबाबतही त्यांनी बँक अधिकाऱ्यांशी चर्चा केली. अशा प्रकरणांमध्ये नियमानुसार योग्य पर्याय शोधून कर्ज वितरणाची कार्यवाही सुलभ करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

पीक कर्ज हे शेतकऱ्यांच्या शेतीविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी महत्त्वाचे असल्याने कर्ज वितरणात अनावश्यक विलंब होणार नाही, याची बँकांनी दक्षता घ्यावी. शेतकऱ्यांच्या अर्जांवर वेळेत निर्णय घेऊन पात्र लाभार्थ्यांना कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *