‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियान प्रभावीपणे राबवा

30 वर्षांवरील नागरिकांच्या आरोग्य तपासणीवर विशेष भर

नांदेड (प्रतिनिधी) :- ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत ‘30 वर्षांचा पल्ला, तपासणी अन् सल्ला’ हे 100 दिवसांचे विशेष अभियान जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय कार्यशाळा व विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची आढावा बैठक संपन्न झाली.
या कार्यशाळेत 30 वर्षांवरील नागरिकांमधील मधुमेह, उच्च रक्तदाब यांसह असंसर्गजन्य आजारांचे प्रतिबंध व नियंत्रण, संतुलित आहार, नियमित व्यायाम व योगासनांचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. जिल्ह्यातील 30 वर्षांवरील सर्व महिला व पुरुषांची यादी तयार करून रक्तदाब व रक्तातील साखरेची तपासणी तसेच त्याची शंभर टक्के नोंदणी एनपीसीडी पोर्टलवर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. महिलांमधील गर्भाशयमुख, स्तन व मुखाच्या कर्करोगाचे वेळीच निदान व उपचाराबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
या आढावा बैठकीत 1 सप्टेंबर ते 31 डिसेंबरदरम्यान एचपीव्ही लसीकरणाचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्याचे, तसेच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले. आयुष्मान भारत डिजिटल मिशन, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, ‘ई-औषधी’, ‘टीबी मुक्त भारत अभियान’ आणि ‘जननी पोर्टल’च्या कामांना गती देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
100 दिवसांच्या या अभियानात जिल्ह्यातील एकही नागरिक आरोग्य तपासणीपासून वंचित राहणार नाही, यासाठी सर्व वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांनी मिशन मोडवर काम करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *