गोवारी समाजाच्या १०० विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये प्रवेश; अर्ज व प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

नांदेड ( प्रतिनिधी ) :- विशेष मागास प्रवर्गातील गोवारी समाजाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये प्रवेश देण्याची योजना लागू करण्यात आली आहे. शासन निर्णयानुसार गोवारी समाजातील विद्यार्थ्यांना दरवर्षी जवळच्या शहरांतील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये इयत्ता १ ली ते १२ वीपर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी व पालकांनी सामाजिक न्याय भवन, ज्ञानमाता शाळेसमोर, सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, नांदेड या कार्यालयात अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

योजनेअंतर्गत १०० विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार असून, निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून जवळच्या शहरांतील इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे.

दरम्यान, शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळा चालविणाऱ्या इच्छुक व नामांकित शैक्षणिक संस्था/शाळांकडूनही विहित नमुन्यातील परिपूर्ण प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. संबंधित संस्थांनी आपले प्रस्ताव १५ जून २०२६ पर्यंत सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, नांदेड यांच्या कार्यालयात सादर करावेत.

यासंदर्भात इतर मागास बहुजन कल्याणचे सहाय्यक संचालक सचिन खुणे यांनी अधिक माहिती देत इच्छुक विद्यार्थी, पालक आणि शैक्षणिक संस्थांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *