डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय आणि डॉ. एस.आर.रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार सन 2025-26 साठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

नांदेड (प्रतिनिधी) :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय आणि डॉ. एस.आर.रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार सन 2025-26 या वर्षासाठी इच्छुक असणारी ग्रंथालये, कार्यकर्ते व सेवक (ग्रंथमित्र) यांनी आपले विहित नमुन्यातील प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रासह शुक्रवार 25 सप्टेंबर 2026 पर्यंत तीन प्रतीत आपल्या जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे पाठवावेत असे आवाहन अशोक गाडेकर प्र. ग्रंथालय संचालक ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी केले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयाकडून राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा, ग्रंथालयाकडून जनतेला अधिक चांगल्या ग्रंथालयीन सेवा उपलब्ध करून द्याव्यात, वाचन संस्कृती वृध्दींगत करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार तसेच ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते व सेवक यांना भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. शियाली रामामृत रंगनाथन यांच्या नावाने डॉ. एस.आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र ) पुरस्कार देण्यात येतात. राज्यातील शहरी व ग्रामीण विभागातील “अ”, “ब”, “क”, “ड”, वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे 1 लाख, 75 हजार, 50 हजार व 25 हजार रुपये इत्यादी रोख रक्कम, सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र आणि ग्रंथ भेट देऊन गौरविण्यात येते.

राज्यातील एक राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व एक राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय सेवक यांना प्रत्येकी 50 हजार रुपये तसेच राज्यातील प्रत्येक महसूल विभागातील प्रत्येकी एक उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व उत्कृष्ट ग्रंथालय सेवक यांना प्रत्येकी 25 हजार रुपये इ. रोख रक्कम, सन्मानचिन्ह प्रमाणपत्र आणि ग्रंथ भेट देऊन गौरविण्यात येते, असेही ग्रंथालय संचालनालयाने प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *