पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत आधार ई-केवायसी सेवा पूर्णपणे नि:शुल्क

नांदेड,( प्रतिनिधी ) :- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे आधार ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्णपणे नि:शुल्क करण्यात आले असून, या सेवेसाठी कोणत्याही लाभार्थी शेतकऱ्याकडून शुल्क आकारता येणार नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ (MahaIT) यांच्या २८ जुलै २०२६ रोजीच्या निर्देशानुसार, प्रत्येक यशस्वी आधार ई-केवायसी प्रमाणीकरणासाठी संबंधित आपले सरकार सेवा केंद्रास (ASSK) महाआयटीमार्फत प्रति लाभार्थी १५ रुपये मानधन अदा करण्यात येणार आहे. त्यामुळे सेवा केंद्र चालकांनी लाभार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क घेऊ नये.

जिल्ह्यातील सर्व आपले सरकार सेवा केंद्रांनी ही सेवा पूर्णपणे नि:शुल्क उपलब्ध करून द्यावी. तसेच प्रत्येक केंद्राच्या दर्शनी भागात “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत आधार ई-केवायसी सेवा पूर्णपणे नि:शुल्क आहे. कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.” असा फलक अनिवार्यपणे प्रदर्शित करावा.

कोणत्याही आपले सरकार सेवा केंद्राकडून शेतकरी किंवा लाभार्थ्याकडून शुल्क आकारण्यात आल्यास संबंधित केंद्राविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल व आवश्यकतेनुसार केंद्र कायमस्वरूपी बंद करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी Aadhaar e-KYC सेवा पूर्णपणे नि:शुल्क असल्याची नोंद घ्यावी. कोणत्याही केंद्राकडून शुल्काची मागणी झाल्यास संबंधित तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयास तात्काळ माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *