राज्यभरात येत्या १५ जुलैपासून मोहिमेस सुरवात; शेतकऱ्यांनी सहायकांना सहकार्य करण्याचे आवाहन
नांदेड, (प्रतिनिधी) :- सातबारा उताऱ्यावर पिकांची नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांना आता स्वत: धावपळ करण्याची गरज भासणार नाही. गेल्या काही वर्षात ई-पीक पाहणी करताना शेतकऱ्यांना आलेल्या तांत्रिक अडचणी आणि त्यामुळे मिळालेला कमी प्रतिसाद यामुळे राज्य सरकारने यंदापासून ही पाहणी थेट तहसील स्तरावर नियुक्त सहायकामार्फत करण्याच्या निर्णय घेतला आहे. येत्या 15 जुलै पासून राज्यभरात ही नवीन पीक पाहणी मोहिम सुरु होत आहे.
ई- पीक पाहणी का महत्वाची
शासकीय योजना, पीक कर्ज आणि पीक विम्याचा लाभ मिळविण्यासाठी ही नोंद आवश्यक आहे. नैसर्गिक आपत्तीच्या काळात अचूक भरपाई मिळण्यास मदत होते.
सरकारी सहायकच घेणार पिकांची नोंदणी
आता सरकारने यामध्ये मोठा बदल केला आहे. यंदापासून तहसीलदार यांनी नियुक्त केलेले विशेष सहाय्यक थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची अधिकृत नोंदणी करणार आहेत.
बचत गटातील महिलांची घेणार मदत
या मोहिमेला गती देण्यासाठी आणि ग्रामीण भागात रोजगार निर्मितीसाठी स्थानिक महिला बचतगटांची मदत घेतली जाणार आहे. बचत गटातील महिलांना आवश्यक ते प्रशिक्षण देऊन पीक पाहणीच्या कामात सहभागी करुन घेतले जाणार आहे.
काय आहे ई-पीक पाहणीची प्रक्रीया
डिजीटल तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांची नोंदणी मोबाईल ॲपद्वारे थेट सातबारा उताऱ्यावर करण्याची ही एक शासकीय यंत्रणा आहे. यामुळे अचूक पीक पेऱ्याची नोंद होते. आतापर्यत शेतकरी मोबाईल ॲपद्वारे ई-पीक पाहणी करायचे आता ती प्रक्रीया सहाय्यक करेल.
ग्रामीण भागात सर्वाकडे स्मार्टफोन उपलब्ध असतोच असे नाही. तसेच अनेक शेतांमध्ये मोबाईल नेटवर्कची मोठी समस्या असते. या तांत्रिक अडचणीमुळे आधी अनेक शेतकरी ई-पीक पाहणी करण्यापासून वंचित राहात होते. यामुळे यावर्षीपासून सहाय्यकच करतील पीक पेरा नोंदणी.
मोबाईलवर येणार मेसेज
ही संपूर्ण यंत्रणा आता केंद्र सरकारच्या ॲग्रिस्टॅक या डिजीटल कृषी परिसंस्थेशी जोडली जात आहे. यामुळे पीक पाहणी पूर्ण होताच, त्याची खात्रीशीर माहिती आणि कन्फर्मेशन मेसेज थेट शेतकऱ्यांच्या मोबाईलवर पाठवला जाणार आहे. जिल्ह्यात १५६० महसूली गावे असून ५२५ पर्यवेक्षक व १६०० सहाय्यक यांची पीक पाहणी पूर्ण करण्याकरिता नेमणूक करण्यात येत आहे. शेतकऱ्यांचा त्रास कमी करणे आणि सातबारावरील पिकांची ऑनलाईन नोंद अचूक होणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. १५ जुलैपासून सुरु होणाऱ्या या मोहिमेत शेतकऱ्यांनी नियुक्त सहायकांना सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी केले आहे.

