नांदेड, (प्रतिनिधी) :- अनुसुचित जमातीच्या (आदिवासी) विद्यार्थांना इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये सन 2026-2027 या वर्षात इयत्ता पहिली मध्ये प्रवेश देण्यासाठी अर्ज करण्याचा कालावधी 20 एप्रिल ते 15 मे 2025 पर्यंत राहिल. त्यानंतर येणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अटीची पुर्तता करत असलेल्या पालकांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवटचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी जेनित चन्द्रा दोन्तुला यांनी केले आहे.
प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट जिल्हा नांदेड कार्यक्षेत्रातील अनुसुचित जमातीच्या (आदिवासी) विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळेत सन 2026-27 मध्ये इयत्ता पहिली मध्ये प्रवेश देण्यासाठी इच्छुक पालकांकडुन इंग्रजी माध्यम नामांकित निवासी शाळेत प्रवेश इयत्ता पहिलीसाठी दिनांक 20 एप्रिल 2026 पासुन विद्यार्थ्यांचे अर्ज प्रकल्प कार्यालय किनवट (माहिती सेतु सुविधा केंद्र) व या कार्यालयातंर्गत असलेल्या सर्व शासकीय आश्रमशाळांवर विनामुल्य उपलब्ध आहेत. येथुन अर्ज प्राप्त करुन घ्यावे. अर्जासोबत पुढील कागदपत्राच्या अटी व शर्ती पुर्ण करुन परिपूर्ण अर्जच सादर करावेत. तसेच वरीष्ठ कार्यालयाकडुन मंजुरी दिलेल्या शाळांना व मंजुर संख्येनुसारच विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल.
अर्जासोबत पुढील कागदपत्राच्या अटी व शर्ती पूर्ण करुन परिपूर्ण अर्ज सादर करावेत. सदर योजनेचा लाभ घेवू इच्छिणारा विद्यार्थी अनुसूचित जमातीच्या असावा. विद्यार्थ्याच्या पालकाचे/विद्यार्थ्याचे नावे सक्षम अधिकाऱ्याने दिलेल्या अनुसूचित जमातीच्या सांक्षांकित दाखल्याची प्रत जोडणे आवश्यक आहे. प्रवेश अर्जासोबत विद्यार्थ्यांचे जन्मतारखेचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. जर विद्यार्थी दारिद्ररेषेखालील असेल तर यादीतील अनु.क्रमांकासह मुळप्रमाणपत्राचे प्रत सादर करणे आवश्यक आहे. अन्यथा दारिद्र रेषेसाठी विचार केला जाणार नाही. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याच्या पालकाचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लक्ष इतके राहील. (तहसिलदार यांचे चालु वर्षाचे एप्रिल 2026 नंतरचे उत्पन्न प्रमाणपत्र सोबत जोडावे).
इयत्ता 1 ली मध्ये प्रवेश घेवु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याचे वय 6 वर्ष पुर्ण असावे. पालकाचे संमतीपत्र व विद्यार्थ्याचे दोन पासपोर्ट फोटो व जन्मतारखेचा दाखला (अंगणवाडी, ग्रामसेवक) यांच्या शिक्का व स्वाक्षरीसह जोडावा. विद्यार्थ्याचे वैद्यकीय पात्रता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. आदिम जमातीच्या विद्यार्थ्याची तसेच विधवा, घटस्फोट, निराधार, परितक्त्या व दारिद्र रेषेखालील अनुसूचित जमातीच्या पालकाचे विद्यार्थ्यांना प्राधान्याने प्रवेश दिले जाईल. घटस्फोटीत यांनी कार्यालयीन निवाडयाची प्रत सोबत जोडावी.
विद्यार्थ्यांचे पालक शासकीय व निमशासकीय नोकरदार नसावेत. (नोकरदार नसल्याचे पालकांनी लेखी लिहुन द्यावी लागेल.) विद्यार्थ्याना वर्ग दुसरी प्रवेशासाठी शिक्षण घेत असलेल्या शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र सादर करावे. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याचे आधार कार्ड जोडणे आवश्यक आहे. अर्ज सादर करावयाचा दिनांक 20 एप्रिल 2026 ते अर्ज स्विकारण्याचा शेवट दिनांक 15 मे 2026 पर्यतच राहील त्यानंतर येणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. सदर अर्जामध्ये खोटी माहिती सादर केल्यास प्रवेश रद्द करण्यात येईल. निवड झालेल्या विद्यार्थ्यास एकदा एका शाळेत प्रवेश निश्चीत झाल्यांनतर कोणत्याही परिस्थितीत पालकांच्या व पाल्याच्या विनंतीनुसार शाळा बदलता येत नाही. याबाबत पालकाचे हमीपत्र सोबत जोडणे आवश्यक आहे. विनंतीनुसार शाळा बदलता येत नाही. याबाबत पालकाचे हमीपत्र सोबत जोडणे आवश्यक आहे. या सर्व अटीची पूर्तता करत असलेल्या पालकांनीय अर्ज सादर करावेत.
आवश्यक कागदपत्रे
अर्जदार विद्यार्थ्याचे नजिकच्या काळातील दोन पासपोर्ट साईज फोटो. पालकाचे रहिवासी प्रमाणपत्र. पालकाचे जातीचे प्रमाणपत्र. उत्पन्नाचा दाखला एप्रिल 2026 नंतरचे. अंगणवाडीचा दाखला (पहिली इयत्तेसाठी) / ग्रामसेवकाचा दाखला. विद्यार्थ्याचा आधारकार्ड. विद्यार्थ्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र दारिद्ररेषेखालील असल्यासबाबतचा दाखला/ग्रामसेवक दाखला. महिला पालक विधवा/घटस्फोटीत/निराधार/परितक्त्या असल्यास ग्रामपंचायतीचा दाखला. ज्या शाळेमध्ये विद्यार्थ्याला प्रवेश मिळाले आहे त्याच शाळेमध्ये इयत्ता पहिली ते बारावी पर्यत शिक्षण घेत असल्याबाबत हमीपत्र.
याप्रमाणे प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट जिल्हा नांदेड या कार्यालयात व या कार्यालयातंर्गत असलेल्या सर्व शासकीय आश्रमशाळामध्ये अर्ज अचुक माहिती भरुन दिनांक 15 मे 2026 पर्यंत या कार्यालयात (माहिती सेतु सुविधा केंद्र) येथे सादर करण्यात यावे.
या निकषामध्ये बसणाऱ्या अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्याना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण घेण्याकरिता या कार्यालयाकडुन अर्ज मागवुन विद्यार्थ्यांची निवड करुन, वरीष्ठ कार्यालयाकडुन प्रवेश देण्याबाबत शाळा नावाचे यादीसह आदेश प्राप्त होताच नामांकित निवासी शाळेत विद्यार्थ्याना प्रवेश देण्यात येईल, असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवटचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी जेनित चन्द्रा दोन्तुला यांनी कळविले आहे.

