सेवा संकल्प अभियानांतर्गत 62 बालकांना मिळणार नवी दृष्टी

• जिल्हा रुग्णालयात केली 171 बालकांची नेत्रतपासणी
• जालना येथील श्री गणपती नेत्रालयात होणार मोफत नेत्रशस्त्रक्रिया

नांदेड(प्रतिनिधी) :- सेवा संकल्प अभियानांतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या माध्यमातून नांदेड येथील जिल्हा रुग्णालयात दि. 3 ऑक्टोबर 2026 रोजी आयोजित नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरात 171 शालेय बालकांची तपासणी करण्यात आली. यापैकी 62 बालके नेत्रशस्त्रक्रियेसाठी पात्र ठरली असून, या सर्व बालकांवर श्री गणपती नेत्रालय, जालना येथे लवकरच मोफत नेत्रशस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत नांदेड जिल्ह्यात 45 आरोग्य पथकांद्वारे अंगणवाडीतील बालकांची वर्षातून दोन वेळा, तर शालेय बालकांची वर्षातून एकदा नियमित आरोग्य तपासणी करण्यात येते. जन्मजात व्यंग, पोषणमूल्यांची कमतरता, शारीरिक व मानसिक विकासातील विलंब तसेच विविध आजारांचे निदान करून आवश्यक उपचार करण्यात येतात. हृदयरोग, नेत्रविकार, आकडी व इतर आजारांसाठी विशेष तपासणी शिबिरे आयोजित करून मोफत निदान व उपचाराची सुविधाही उपलब्ध करून दिली जाते. याच उपक्रमाचा भाग म्हणून श्री गुरु गोबिंदसिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालय, नांदेड येथे तिरळेपणा, जन्मजात मोतीबिंदू व पापणी झुकणे आदी नेत्रविकारांसाठी तपासणी, उपचार व शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले. श्री गणपती नेत्रालय, जालना आणि जिल्हा रुग्णालय, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात 171 बालकांची नेत्रतपासणी करण्यात आली. त्यापैकी 62 बालके शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरली असून त्यांच्यावर जालना येथील श्री गणपती नेत्रालयात मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्राच्या माध्यमातून 0 ते 6 वर्षे वयोगटातील बालकांमध्ये आढळणारे जन्मजात आजार, बालपणातील आजार, जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे होणारे आजार तसेच विकासात्मक विलंब यांचे वेळीच निदान करून आवश्यक शस्त्रक्रिया व औषधोपचार केले जातात. तसेच अंगणवाडी तपासणीदरम्यान आढळणाऱ्या कुपोषित बालकांना पोषण पुनर्वसन केंद्रात संदर्भित करून उपचार व श्रेणीवर्धनासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.

या उपक्रमासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, लातूरच्या आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. रेखा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनुपमा शिंदे, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी आणि निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजाभाऊ बुट्टे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. चंद्रशेखर आपनगिरे, डॉ. रोषनआरा तडवी, श्री.चंदनकर, आरबीएसके समन्वयक अनिल कांबळे, डीईआयसी व्यवस्थापक विठ्ठल तावडे, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता आकाश जोंधळे, तसेच नेत्र चिकित्सा अधिकारी अनिता चव्हाण, शुभांगी रुदेवाड आणि प्रिया जाधव यांच्यासह राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. शिबिरासाठी आपुलकी सेवा संघाच्या वतीने उपस्थित लाभार्थ्यांना मोफत अन्नदान करण्यात आले. मोफत नेत्रशस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध झाल्याबद्दल पात्र बालकांच्या पालकांनी समाधान व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *