नांदेड (प्रतिनिधी) :- उमरी तालूक्यातील हुंडा (ग.प) येथे तालुका सहाय्यक कृषी अधिकारी एस. डी. नागलवाड यांच्या सह ग्राम महसूल अधिकारी योगेश शिंदे यांनी रविवारी दुष्काळाच्या सावट आलेल्या भागात पाहणी दौरा केला. यावेळी गावाचे तंटामुक्ती अध्यक्ष दत्ता शिर्के , भुजंगराव शिंदे, मारोतराव थिटे, बाबाराव राक्षसमारे, शिवाजी राक्षसमारे, नामदेव शिर्के आदी गावकरी उपस्थित होते.
नांदेड जिल्ह्यात सरासरी पर्जन्यमान ८९१.३० मिलीमीटर एवढे आहे. त्यातही उमरी तालुक्यात ८५७.४० मिलीमीटर एवढे पर्जन्यमान होत असते परंतु या वर्षी अल निनोच्या संकटामुळे पावसाने दडी मारल्यामुळे पर्जन्यमान केवळ 70 टक्के म्हणजेच 600 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे पिके अक्षरशा वाळून गेली आहेत. मूग, उडीद, सोयाबीन, कापूस, तूर आदी पिके हातची वाया गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पाण्यामुळे पिके तर वाया गेलीच आहेत आता जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आ वासून उभा आहे त्याच बरोबर पिण्याचा पाण्याचा प्रश देखील येणाऱ्या काळात उद्भवणार आहे. या दुष्काळी संकटावर मात कशी करावे अश्या विवेचनात बलीराजा अडकला आहे. सरकार आता काय मदत करते याकडे तो डोळे लावून बसला आहे. साहेब पंचनामे काय करता..? आमचे सर्वच पीक वाया गेले आहे आता आम्ही कस जगावे..? अशी आर्त टाहो फोडताना तो दिसून येत आहे.

