संशोधक विद्यार्थ्यांचे आंदोलन नवव्या दिवशीही सुरूच….

मुख्यमंत्री भेट न झाल्याने संशोधक विद्यार्थ्यांमध्ये नाराजी; मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार

छत्रपती संभाजीनगर, (प्रतिनिधी) :- पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी समाजकल्याण कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे सुरू असलेले बेमुदत धरणे आंदोलन रविवारी नवव्या दिवशीही सुरूच राहिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घडवून आणण्याचे आश्वासन मिळाल्यानंतरही नियोजित भेट होऊ न शकल्याने संशोधक विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दि. १७ सप्टेंबर रोजी भेट घडवून आणावी, या मागणीसाठी संशोधक विद्यार्थ्यांनी जिल्हा प्रशासन तसेच पोलिस प्रशासनाकडे निवेदन सादर केले होते. त्यानंतर दि. १७ सप्टेंबर रोजी संशोधक अरुण मते व प्रेम पवार यांना मुख्यमंत्र्यांची भेट घडवून देण्याच्या अनुषंगाने पोलिसांनी सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात स्थानबद्ध करून ठेवले.

यावेळी पोलिस निरीक्षक अविनाश आगाव यांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या माहितीनुसार, मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी अचानक सकाळी उपोषण सोडून छत्रपती संभाजीनगरकडे रवाना झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तातडीने पुढे रवाना व्हावे लागले. त्यामुळे नियोजित भेट होऊ शकली नसल्याचे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी तयार केलेले निवेदन पोलिसांकडे सुपूर्द करून ते मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत पोहोचविण्याची विनंती केली.

सरसकट पीएच.डी. फेलोशिपची मागणी

संशोधक विद्यार्थ्यांनी सारथी, बार्टी, महाज्योती, टार्टी, आर्टी, वनार्टी व अमृत यांच्या माध्यमातून पीएच.डी. नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांना सरसकट संशोधन अधिछात्रवृत्ती देण्याची मागणी केली आहे. तसेच पीएच.डी. फेलोशिपच्या रकमेतून घरभाडे भत्ता (HRA) आणि आनुषंगिक निधी (Contingency Grant) कपात रद्द करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

संशोधन अधिछात्रवृत्तीसाठी अर्ज करण्यासाठी असलेली ३५ वर्षांची वयोमर्यादेची अट शिथिल करण्यात यावी. तसेच २०२६ मध्ये पीएच.डी. नोंदणी झालेल्या संशोधक विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्तीच्या प्रक्रियेत सहभागी करून घ्यावे, अशीही मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

मंत्री संजय शिरसाट यांच्याशी चर्चा

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संशोधक विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री संजय शिरसाट यांची भेट घेऊन विविध मागण्यांबाबत चर्चा केली. विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशोधक विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा विषय आगामी मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्यात येईल, असे मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले.

तसेच बार्टीच्या २०२३ मधील विद्यार्थ्यांसाठी शासनाने निर्णय घेतला असून, संशोधक विद्यार्थ्यांचा प्रश्नही सोडविण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे, राधाकृष्ण विखे पाटील, अब्दुल सत्तार यांना निवेदन

संशोधक विद्यार्थ्यांनी शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. तसेच माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करून निवेदन देण्यात आले.

आमदार अब्दुल सत्तार यांनाही संशोधक विद्यार्थ्यांनी निवेदन देऊन विद्यार्थ्यांचे प्रश्न शासनस्तरावर मांडून ते सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली.

विविध विद्यार्थी संघटनांचा पाठिंबा

संशोधक विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला एसएफआय, एआयएसएफ, महिला काँग्रेस, सम्यक विद्यार्थी आंदोलन, पॅन्थर परिवर्तन चळवळ, नागरी मूलभूत हक्क अभियान आणि सत्यशोधक विद्यार्थी संघटना, महाराष्ट्र यांनी पाठिंबा दिला आहे. विविध विद्यार्थी व सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून संशोधक विद्यार्थ्यांच्या मागण्यांना समर्थन व्यक्त केले.

मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार

समाजकल्याण कार्यालय येथे सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाचा नववा दिवस पूर्ण झाला असून, शासनाने संशोधक विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाला भेटीसाठी वेळ द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार संशोधक विद्यार्थ्यांनी व्यक्त केला असून, शासनाकडून ठोस निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

यावेळी अरुण मते, मनिषा बल्लाळ,भारत पवार, कृष्णा घाडगे, गीता मगर, मोहन मुंडे,हरीकेश मोरे, अभिषेक गायकवाड, मंगेश घाटूळ, श्वेता वराडे, आरती दांगोडे, मिरा सावंत, प्रदीप चव्हाण, रवी राठोड, श्रीकांत पातोळे, यांच्यासह मोठ्या संख्येने संशोधक विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *