नांदेड (प्रतिनिधी) :- नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथून आषाढी एकादशी निमित्त श्री क्षेत्र पंढरपूरकडे जाणाऱ्या सद्गुरू श्री गुंडा महाराज संस्थान, देगलूर यांच्या दिंडीची परंपरा अनेक वर्षांपासून अखंडपणे सुरू आहे. या दिंडीसोबत नांदेड जिल्ह्यातील मोठ्या संख्येने वारकरी पायी वारी करीत श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरला जातात. दिवसभराच्या पायी प्रवासामुळे वारकऱ्यांना होणारा शारीरिक थकवा कमी करणे, त्यांच्या पायांची व स्नायूंची योग्य काळजी घेणे, आवश्यक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या समन्वयाने “चरणसेवा” हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गत वारकऱ्यांना तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली भौतिक उपचार (Physiotherapy) तसेच आयुष चिकित्सा पद्धतीनुसार पंचकर्म उपचार (स्नेहन व स्वेदन) विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या उपचारांमुळे पायी चालण्यामुळे निर्माण होणारा थकवा कमी होऊन वारकऱ्यांना पुढील प्रवास अधिक सुलभ होण्यास मदत होईल.
उपक्रमाचे आयोजन
हा उपक्रम खालील मान्यवर व संस्थांच्या संयुक्त सहकार्याने आयोजित करण्यात येत आहे –
• मा. डॉ. तुषारभाऊ राठोड, आमदार, मुखेड विधानसभा मतदारसंघ
• शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, नांदेड
• सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नांदेड
• नांदेड फिजिओथेरपी कॉलेज, पांगरी, नांदेड
• अनुलोम, नांदेड
कार्यक्रमाचे तपशील
दिंडीचे नाव : सद्गुरू श्री गुंडा महाराज संस्थान, देगलूर
वार : बुधवार
दिनांक : ०८ जुलै २०२६
स्थळ : सावरगाव पीर, ता. मुखेड, जि. नांदेड
वेळ : सकाळी ९.०० ते दुपारी ११.००
सेवा : “चरणसेवा” – फिजिओथेरपी व पंचकर्म उपचार
सर्व वारकरी बांधवांनी या मोफत आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

