नांदेड, (प्रतिनिधी) :- भारत सरकारच्या मेरा युवा भारत नांदेड यांच्या वतीने ‘नशामुक्त युवा – विकसित भारत’ संकल्प अभियानाचे आयोजन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथील समाजशास्त्र विभागाच्या सहकार्याने 2 ऑगस्ट रोजी करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) आयोजित करण्यात आले. कार्यक्रमास २०० हून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त उपस्थिती दर्शविली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर होते. प्रमुख उपस्थिती म्हणून राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. मारोती गायकवाड तसेच जिल्हा युवा अधिकारी अशनी अनिल कनकटे उपस्थित होत्या.
थेट प्रक्षेपणाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील युवकांना व्यसनमुक्त भारताच्या निर्मितीसाठी पुढील १०० रविवार विविध जनजागृती उपक्रम राबविण्याचे आवाहन केले. त्यांनी युवकांना व्यसनमुक्त जीवनशैली स्वीकारून विकसित भारताच्या निर्मितीत सक्रिय योगदान देण्याचा संदेश दिला. त्यानंतर उपस्थित सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींनी ‘नशामुक्त युवा-विकसित भारत’ संकल्पाची शपथ घेतली.
यावेळी कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी युवकांची सामाजिक जबाबदारी, व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व आणि राष्ट्रनिर्मितीत युवकांच्या सक्रिय सहभागाची आवश्यकता अधोरेखित केली. डॉ. मारोती गायकवाड यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी युवकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
जिल्हा युवा अधिकारी, MY Bharat अशनी अनिल कनकटे यांनी मार्गदर्शन करताना व्यसनमुक्ती ही केवळ वैयक्तिक नव्हे तर सामाजिक चळवळ असून प्रत्येक युवकाने समाजात जनजागृती करण्यासाठी सक्रिय भूमिका बजावावी, असे आवाहन केले.
कार्यक्रमाची सुरुवात पूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नितीन गायकवाड यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे बंडू कांबळे, सिस्टीम एक्सपर्ट विभागाचे विजय हनवते, सह्याद्री पगडे, नरसिंग कागडा तसेच विद्यापीठातील प्राध्यापक, कर्मचारी, स्वयंसेवक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी मोलाचे सहकार्य केले.
माय भारतच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाने युवकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत व्यापक जनजागृती निर्माण करत ‘विकसित भारत’ घडविण्याच्या राष्ट्रीय संकल्पाला बळकटी दिली.

