अंगदान महादान – हेच श्रेष्ठ जीवनदान

नांदेड, (प्रतिनिधी) :- ‘अंगदान जीवन संजीवनी अभियान-२०२६’ अंतर्गत अवयवदान जनजागृतीसाठी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, विष्णुपुरी, नांदेड येथे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बधिरीकरण विभागाच्यावतीने गुरुवार, ३० जुलै २०२६ रोजी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे ही स्पर्धा अत्यंत उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाली.

कार्यक्रमास अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच उपअधिष्ठाता डॉ. शीतल राठोड, डॉ. हुमेरा खान, डॉ. भावना भगत, डॉ. शिवानंद देवसरकर, डॉ. मोहन भंडारी यांच्यासह प्राध्यापकवृंद, नर्सिंग स्टाफ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. संजय मोरे (प्राध्यापक व विभागप्रमुख, सूक्ष्मजीवशास्त्र), डॉ. प्रदीप बोडके (प्राध्यापक व विभागप्रमुख, मनोविकारशास्त्र) आणि डॉ. समीर (प्राध्यापक व विभागप्रमुख, शरीरविकृतीशास्त्र) यांनी जबाबदारी पार पाडली.

स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी अंगदानाचे सामाजिक, वैद्यकीय व मानवी मूल्य अधोरेखित करणारी प्रभावी व प्रेरणादायी भाषणे सादर केली. परीक्षकांनी घोषित केलेल्या निकालानुसार डॉ. युवराज बरसाळे (डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय) यांनी प्रथम क्रमांक, कु. गौरी शिंदे यांनी द्वितीय क्रमांक, कु. रुचिका राठोड यांनी तृतीय क्रमांक, तर श्री. कन्हय्यालाल व कु. मानसी कुंभकर्ण (शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय) यांनी उत्तेजनार्थ पारितोषिके मिळविली. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.

यावेळी अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी आपल्या मनोगतात अवयवदान जनजागृतीचे समाजातील महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, अवयवदानाबाबत व्यापक जनजागृती झाल्यास मेंदूमृत रुग्णांच्या नातेवाईकांना अवयवदानाचे महत्त्व पटवून देणे अधिक सोपे होईल आणि अनेक गरजू रुग्णांना नवजीवन मिळू शकेल.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. वैष्णवी कुलकर्णी (प्राध्यापक व विभागप्रमुख), डॉ. सचिन तोटावार (सहयोगी प्राध्यापक) व डॉ. नाझिमा मेमन यांनी विशेष योगदान दिले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. मीनाक्षी चोले यांनी केले.
“अंगदान महादान – हेच श्रेष्ठ जीवनदान!” या संदेशाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *