महसूल कायदे व चॅप्टर प्रकरणांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशिक्षण

नांदेड, (प्रतिनिधी) :- महसूल प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची कायदेशीर समज अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या संकल्पनेतून जिल्हा नियोजन भवन येथे महसूल कायदे, चॅप्टर प्रकरणे आणि कायदा-सुव्यवस्था विषयक बाबींवर चर्चासत्र व प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमात निवृत्त मुख्य जिल्हा न्यायाधीश श्री. वेदपाठक यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून महसूल प्रशासनाशी संबंधित विविध कायदे, नैसर्गिक न्यायाची तत्त्वे, सुनावणी प्रक्रिया, आदेश लेखन, पुराव्यांचे मूल्यमापन आणि न्यायालयीन पडताळणीत टिकणारे आदेश कसे द्यावेत याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

तसेच भारतीय नागरी सुरक्षा संहिता (BNSS) अंतर्गत चॅप्टर प्रकरणे दाखल करण्याची प्रक्रिया, प्रतिबंधात्मक कारवाई, शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी महसूल अधिकाऱ्यांची भूमिका, नोटीस बजावणी, साक्षी-पुरावे नोंदविणे, कारणे दाखवा नोटीस, हमीपत्रे आणि जामीन प्रक्रियेच्या विविध पैलूंवर त्यांनी प्रकाश टाकला.

यावेळी महसूल अधिकाऱ्यांच्या आदेशांमध्ये वस्तुनिष्ठता, कायदेशीर अचूकता आणि पारदर्शकता असणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. जमीन महसूल संहिता, जमीन अभिलेख, अतिक्रमण, अपील प्रक्रिया तसेच महसूल न्यायालयीन कामकाजातील त्रुटी टाळण्याचे उपाय आणि प्रकरणांच्या प्रभावी निपटाऱ्याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.

प्रशिक्षणादरम्यान उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध शंकांचे निरसन करण्यात आले. प्रत्यक्ष कामकाजातील उदाहरणांद्वारे महसूल आणि न्यायालयीन प्रक्रियेतील महत्त्वाचे बारकावे स्पष्ट करण्यात आले.

कार्यक्रमास जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, सहायक जिल्हाधिकारी झेनिथ चंद्रा दोंतुला, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांच्यासह जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, महसूल अधिकारी, नगरपालिकांचे मुख्याधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या प्रशिक्षणामुळे महसूल प्रशासनातील निर्णय प्रक्रियेत गुणवत्ता, पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *