नांदेड जिल्ह्यात ‘शून्य कुष्ठरोग मोहिमेला’ प्रारंभ; ८९२ गावांमध्ये विशेष सर्वेक्षण ; आतापर्यंत ८५ हजारहून अधिक नागरिकांची तपासणी

नांदेड (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा संचालनालयाच्या निर्देशानुसार, शाश्वत विकास ध्येयांतर्गत गाव पातळीवर शून्य कुष्ठरोग प्रलंबन साध्य करण्यासाठी नांदेड जिल्ह्यात शून्य कुष्ठरोग मोहिमेची’यशस्वी सुरुवात करण्यात आली आहे.

ही मोहीम जिल्हाधिकारी राहुल कर्डिलेआणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली राबवली जात आहे. या मोहिमेचे सूक्ष्म नियोजन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी व सहसंचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग डॉ. बालन यांच्या नेतृत्वात करण्यात आले असून, जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा यासाठी पूर्ण ताकदीने कार्यरत आहे.
मोहिमेची सद्यस्थिती आणि आकडेवारी:
*एकूण गावे: जिल्ह्यात या मोहिमेअंतर्गत एकूण १,६०४ गावांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
*सर्वेक्षण अंतर्गत गावे: मागील ५ वर्षांत शून्य कुष्ठरोग आढळलेली ८९२ गावे या विशेष सर्वेक्षणासाठी निवडण्यात आली आहेत.
*एकूण लक्ष्यित लोकसंख्या: या गावांमधील एकूण लक्ष्यित लोकसंख्या ४,८१,०५५ इतकी आहे.
*झालेले सर्वेक्षण: आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत आतापर्यंत ८५,१३३ लोकसंख्येचे यशस्वी सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.
*संशयित रुग्ण: गेल्या आठवड्याभरात करण्यात आलेल्या तपासणी दरम्यान जिल्ह्यात २८५ संशयित रुग्ण आढळून आले असून, त्यांची पुढील वैद्यकीय तपासणी व योग्य उपचार सुरू करण्यात येत आहेत.
१५ जून २०२६ पर्यंत चालणार मोहीम
शासकीय आदेशानुसार ही मोहीम १५ मे ते १५ जून २०२६ या कालावधीत राबवली जात आहे. राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमातील शहरी व ग्रामीण भागातील कर्मचारी, स्थानिक बहुउद्देशीय कर्मचारी (MPW) तसेच आशा आणि ए.एन.एम. (ANM) यांच्यामार्फत हे गुणात्मक सर्वेक्षण घराघरांमध्ये जाऊन केले जात आहे. शहरी भागातील अवैद्यकीय सहाय्यकांचीही (Non-Medical Assistants) यासाठी मदत घेतली जात आहे.
आवाहन: कुष्ठरोग हा पूर्णपणे बरा होणारा आजार आहे. सुरुवातीच्या काळातच याचे निदान झाल्यास पुढील होणारे शारीरिक व्यंग टाळता येते. त्यामुळे नागरिकांनी आपल्या भागात येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना योग्य माहिती देऊन सहकार्य करावे आणि मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *