भारताची इंग्लंडवर २०३ धावांनी मात

बर्मिंगहॅम : भारताने बर्मिंगहॅम कसोटीत इंग्लंडचा २०३ धावांनी दारुण पराभव करत मालिकेतील पहिला विजय नोंदवला आहे. या विजयामुळे पहिले दोन कसोटी सामने गमावणाऱ्या भारताचे मालिकेतील आव्हान कायम राहिले आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत आता इंग्लंडकडे २-१ अशी आघाडी असून भारताच्या विजयामुळे मालिकेतील चुरस वाढली आहे. आज अखेरच्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर अवघ्या ६ धावांची भर घालून इंग्लंडचा डाव ३१७ धावांवर संपुष्टात आला. अँडरसनच्या रूपाने अश्विनने इंग्लंडचा शेवटचा बळी टिपला. भारताने हा सामना २०३ धावांनी जिंकला असून लागोपाठ दोन पराभव पाहणाऱ्या भारतीय संघासाठी हा विजय नवी उभारी देणारा ठरणार आहे.
या विजयानंतर विराट कोहलीने कर्णधार म्हणून यशाच्या बाबतीत सौरव गांगुलीला मागे टाकले आहे. गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारताने ४९ पैकी २१ कसोटी सामने जिंकले होते तर १३ सामन्यांत पराभव पदरी पडला होता. विराटच्या नेतृत्वाखाली भारत ३८ सामने खेळला असून त्यापैकी २२ सामन्यांत विजय मिळाला आहे तर केवळ ७ सामने भारताने गमावले आहेत. भारताच्या सर्वाधिक यशस्वी कर्णधारांमध्ये महेंद्रसिंग धोनी पहिल्या स्थानी आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २७ कसोटीविजय मिळवले आहेत.
   बुमराहचे पाच बळी
भारताने दिलेल्या ५२१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चौथ्या दिवसअखेर इंग्लंडने ९ बाद ३११ धावा केल्या होत्या. खरे तर भारतीय संघ चौथ्याच दिवशी विजय मिळवणार, असे वाटत होते. मात्र, जोस बटलर, बेन स्टोक्स, आदिल रशीदने भारताचा विजय लांबवला. भारताकडून जसप्रीत बुमराहने इंग्लंडचा निम्मा संघ गारद केला. चौथ्या दिवशीच्या पहिल्याच षटकात इशांतने जेनिंग्जला पंतकरवी झेलबाद केले. त्यापाठोपाठ कूकलाही इशांतनेच परतीचा मार्ग दाखविला. त्यानंतर कर्णधार जो रूट आणि ओली पोप यांनी इंग्लंडला अर्धशतकी टप्पा पार करून दिला. २५व्या षटकात बुमराहने रूटला राहुलकरवी झेलबाद केले, त्यापाठोपाठ शमीने पोपला बाद केल्याने इंग्लंडची २६व्या षटकात ४ बाद ६२ अशी अवस्था झाली होती. त्या वेळी भारतीय संघ चौथ्या दिवशीच विजय साजरा करणार असे वाटत होते. मात्र, स्टोक्स आणि बटलर यांनी कडवी झुंज दिली. त्यांनी दीडशतकी भागीदारी करून इंग्लंडला दोनशे धावांचा टप्पा पार करून दिला. बटलरने कारकिर्दीतील पहिलेवहिले शतक साजरे केले. नवीन चेंडू घेतल्यानंतर बुमराहने भारताला यश मिळवून दिले. ८३व्या षटकात बुमराहने बटलरला पायचीत केले. त्यापाठोपाठ आलेल्या बेअरस्टोचा त्रिफळा उडविला. यानंतर रशीद आणि ब्रॉडने नवव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. बुमराहने रशीदला बाद केले होते. मात्र, तो नोबॉल होता. यानंतर कोहलीने रशीदला जीवदान दिले. बुमराहने ब्रॉडला बाद करून भारताच्या विजयाच्या आशा पल्लवीत केल्या होत्या. मात्र, वाढीव षटके मिळूनही भारताला रशीद-अँडरसन जोडी फोडता आली नाही. भारताला विजयासाठी पाचव्या दिवशी मैदानात उतरावे लागले. अवघ्या १० मिनिटांचा खेळ आज झाला. अश्विनने अँडरसनचा बळी टिप भारताचा विजय साकारला. दरम्यान, ५ सामन्यांच्या मालिकेत आता २-१ अशी स्थिती झाली असून मालिकेतील आव्हान राखण्यासाठी भारताला उरलेल्या दोन्ही सामन्यांत चमकदार कामगिरी करावी लागणार आहे. चौथी कसोटी ३० ऑगस्टपासून रंगणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *